घरक्रीडाTokyo Olympics : मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये जाणे टाळा; खेळाडूंसह अधिकाऱ्यांना आयोजकांकडून...

Tokyo Olympics : मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये जाणे टाळा; खेळाडूंसह अधिकाऱ्यांना आयोजकांकडून ताकीद

Subscribe

टोकियो ऑलिम्पिकसाठी केवळ खेळाडूच नाही, तर अधिकारी आणि पत्रकारही परदेशातून जपानमध्ये दाखल झाले आहेत.

टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरुवात होणार असून त्याआधीच ऑलिम्पिक क्रीडानगरीत (Olympic Village) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल संघातील दोन खेळाडूंचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ सोमवारी चेक प्रजासत्ताकच्या व्हॉलीबॉल खेळाडूला, तसेच अमेरिकेच्या एका जिम्नॅस्टला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे क्रीडानगरीत कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी रात्री ८ नंतर सुरु असलेल्या आणि मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये जाणे टाळा अशी सक्त ताकीद आयोजकांकडून खेळाडू, अधिकारी आणि पत्रकारांना देण्यात आली आहे.

मद्यपान करून नियमांचे उल्लंघन 

टोकियो ऑलिम्पिकसाठी केवळ खेळाडूच नाही, तर अधिकारी आणि पत्रकारही परदेशातून जपानमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही जण बाहेर जेवायला गेल्याचे, तसेच मद्यपान करून नियमांचे उल्लंघन करत असल्याची माहिती जपानी मीडियाने दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, ऑलिम्पिक क्रीडानगरीतील व्यक्तींना रात्री ८ नंतर सुरु असलेल्या आणि  मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये जाणे टाळा अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली आहे.

१४ दिवस पूर्ण झाल्यावरही नियम पाळा

तसेच जपानमध्ये येऊन १४ दिवस पूर्ण झाल्यावरही हे नियम पाळण्याची सूचना आयोजकांकडून करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तुमच्या, तुम्ही काम करत असलेल्या संस्थेच्या आणि टोकियो ऑलिम्पिकच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याचा धोका असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ऑलिम्पिकच्या आयोजकांनी मान्यताप्राप्त (Accredited) व्यक्तींना पत्र पाठवून या सूचना केल्या आहेत.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -