घरक्रीडाचेल्सी-आयेक्स सामन्यात ४-४ बरोबरी; लिव्हरपूलचा विजय

चेल्सी-आयेक्स सामन्यात ४-४ बरोबरी; लिव्हरपूलचा विजय

Subscribe

युएफा चॅम्पियन्स लीग

इंग्लिश संघ चेल्सी आणि डच संघ आयेक्समधील युएफा चॅम्पियन्स लीगचा थरारक सामना ४-४ असा बरोबरी संपला. चेल्सीचा संघ या सामन्यात १-४ असा पिछाडीवर होता. मात्र, त्यांनी दमदार पुनरागमन केले. या सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला आयेक्सच्या दोन खेळाडूंना रेड कार्ड मिळाल्याने त्यांना उर्वरित सामन्यांत ९ खेळाडूंसह खेळावे लागले. चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात तीन गोल मागे पडल्यानंतरही पराभूत न होणारा चेल्सी हा केवळ तिसरा इंग्लिश संघ आहे.

हा सामना सुरुवातीपासूनच रंगतदार झाला. या सामन्याच्या दुसर्‍या मिनिटाला आयेक्सला फ्री-किक मिळाली. क्विन्सी प्रॉम्सने मारलेल्या या फ्री-किकवर टॅमी अब्राहमने स्वयं गोल केल्याने आयेक्सला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र, पुढच्याच मिनिटाला जोएल वेल्टमनने क्रिस्टियन पुलिसीचला पेनल्टी बॉक्समध्ये अयोग्यरीत्या पाडल्याने चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर जॉर्जिन्होने गोल करत चेल्सीला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर २० व्या मिनिटाला हकीम झियाचच्या क्रॉसवर प्रॉम्सने गोल करत आयेक्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढेही आयेक्सने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. ३५ व्या मिनिटाला चेल्सीचा गोलरक्षक केपाने केलेल्या स्वयं गोलमुळे आयेक्सला ३-१ अशी आघाडी मिळाली. ही आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंत राखण्यात यश आले.

- Advertisement -

मध्यंतरानंतर चेल्सीने आपल्या खेळात सुधारणा केली. ५३ व्या मिनिटाला चेल्सीचा स्ट्रायकर अब्राहमला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका आयेक्सचा गोलरक्षक ओनानाने अडवला. दोन मिनिटांनंतरच डॉनी वॅन डी बिकने आयेक्सचा चौथा गोल केला. यानंतर आयेक्सला चांगला खेळ करता आला नाही. चेल्सीने मात्र आक्रमक खेळ करत ६३ व्या मिनिटाला आयेक्सची आघाडी २-४ अशी कमी केली. त्यांचा हा गोल कर्णधार सेजार अ‍ॅझपिलीक्वेटाने केला.

या सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला आयेक्सच्या दोन खेळाडूंना रेड कार्ड मिळाले. तर चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर पुन्हा जॉर्जिन्होने गोल केला. ७४ व्या मिनिटाला युवा रीस जेम्सने आणखी एक गोल करत चेल्सीला ४-४ अशी बरोबरी करून दिली. यानंतर चेल्सीला गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या, पण त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना बरोबरीतच संपला.

- Advertisement -

दुसरीकडे गतविजेत्या लिव्हरपूलला आपला सामना जिंकण्यात यश आले. त्यांनी गेंक संघावर २-१ अशी मात केली. लिव्हरपूलकडून पूर्वार्धात जिनी वाईनाल्डम आणि उत्तरार्धात अ‍ॅलेक्स ऑक्सलेड-चेम्बरलीनने गोल केले. तसेच डॉर्टमन्डने इंटर मिलानचा ३-२ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -