घरक्रीडायुएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

Subscribe

‘अवे गोल्स’ नियमानुसार मँचेस्टर सिटीवर केली मात

मँचेस्टर सिटीच्या मैदानावर झालेला रोमांचक दुसरा लेग ४-३ असा गमावूनही टॉटनहॅम हॉट्सपर या संघाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टॉटनहॅमने त्यांच्या घरच्या मैदानावर झालेला पहिला लेग १-० असा जिंकला होता. त्यामुळे ‘अवे गोल्स’ म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर जास्त गोल मारल्याने टॉटनहॅमने पुढील फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. त्यांनी १९६१-६२ च्या मोसमानानंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग/ युरोपियन कपची उपांत्य फेरी गाठली आहे.

या लढतीचा पहिला लेग १-० असा गमावल्यामुळे दुसर्‍या लेगमध्ये मँचेस्टर सिटीला चांगल्या सुरुवातीची गरज होती आणि ती त्यांना मिळाली. या सामन्याच्या चौथ्या मिनिटाला केविन डी ब्रुनच्या पासवर रहीम स्टर्लिंगने गोल करत मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांना ही आघाडी फारकाळ टिकवता आली नाही. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला स्टार खेळाडू हॅरी केनच्या अनुपस्थितीत स्ट्रायकर म्हणून खेळणार्‍या सॉन ह्युंग मिनने गोल करत टॉटनहॅमला १-१ अशी बरोबरी करून दिली, तर १० व्या मिनिटाला क्रिस्टियन एरिकसनच्या पासवर अप्रतिम फटका मारत पुन्हा सॉननेच गोल केला आणि टॉटनहॅमला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

मात्र, पुढच्याच मिनिटाला बर्नार्डो सिल्वाने मँचेस्टर सिटीचा दुसरा गोल करत सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. पुढे मँचेस्टर सिटीने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. याचा फायदा त्यांना २१ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा डी ब्रुनच्या मैदानी पासवर स्टर्लिंगने गोल करत सिटीला या सामन्यात ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम ठेवली.

सिटीने मध्यंतरानंतरही आक्रमक सुरुवात केली. ५९ व्या मिनिटाला डी ब्रुनच्या पासवर सर्जियो अगुव्हेरोने अप्रतिम फटका मारत मँचेस्टर सिटीला या सामन्यात ४-२ अशी तर एकंदरीत ४-३ आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आता टॉटनहॅमला पुढील फेरीत जाण्यासाठी एका गोलची गरज होती आणि तो गोल त्यांनी ७३ व्या मिनिटाला केला. त्यांचा हा गोल फर्नांडो लॉरेंटेने केला. त्यामुळे पुन्हा सिटीला एक गोल मारणे अनिवार्य झाले. त्यांनी हा गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. ९० मिनिटानंतरच्या अतिरिक्त वेळेत अगुव्हेरोच्या पासवर स्टर्लिंगने सिटीचा पाचवा गोल केला. मात्र, यानंतर व्हीएआरचा (व्हिडिओ सहाय्यक रेफ्री) पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये अगुव्हेरो ऑफसाईड असल्याचे आढळल्याने हा गोल रद्द करण्यात आला. यानंतर सिटीला गोल करता आला नाही आणि हा सामना ४-३ असा जिंकूनही त्यांना ‘अवे गोल्स’ नियमानुसार स्पर्धेबाहेर जावे लागले.

- Advertisement -

मँचेस्टर सिटी आणि टॉटनहॅम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये पहिल्या २१ मिनिटांत दोन्ही संघांनी मिळून ५ गोल केले. त्यामुळे या संघांनी मिळून सर्वात कमी वेळात पाच गोल करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम बुरुशीय डॉर्टमंड आणि लेगीया वॉर्सा यांच्यातील सामन्यात झाला होता. २०१६ मध्ये झालेल्या सामन्यात या दोन संघांनी मिळून २४ मिनिटांत ५ गोल केले होते. डॉर्टमंडने हा सामना ८-४ असा जिंकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -