घरक्रीडाकर्नाटकाला अजिंक्यपद; मिथुनची हॅट्ट्रिक

कर्नाटकाला अजिंक्यपद; मिथुनची हॅट्ट्रिक

Subscribe

विजय हजारे करंडक

बर्थडे-बॉय अभिमन्यू मिथुनने हॅटट्रिकसह पाच गडी बाद केल्यामुळे कर्नाटकाने अंतिम सामन्यात तामिळनाडूवर व्हीजेडी नियमानुसार ६० धावांनी मात करत विजय हजारे करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकण्याची ही कर्नाटकाची चौथी वेळ होती. आपल्या तिसाव्या वाढदिवशी मिथुनने ३४ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स मिळवल्या.

अंतिम सामन्यात कर्नाटकाचा कर्णधार मनीष पांडेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तामिळनाडूच्या मुरली विजयला खातेही उघडता आले नाही, तर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रविचंद्रन अश्विन ८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे तामिळनाडूची २ बाद २४ अशी अवस्था होती. यानंतर अभिनव मुकुंद आणि बाबा अपराजित यांनी १२४ धावांची भागीदारी करत तामिळनाडूचा डाव सावरला. मुकुंदने ११० चेंडूत ८५ आणि अपराजितने ८४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. यानंतर विजय शंकर (३८) आणि शाहरुख खान (२७) या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. डावाच्या अखेरच्या षटकात मिथुनने शाहरुख, मोहम्मद आणि मुरुगन अश्विन या सलग तीन चेंडूंवर बाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे तामिळनाडूचा डाव २५२ धावांवर संपुष्टात आला.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना यंदा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या कर्नाटकाच्या देवदत्त पडिक्कलला ११ धावांवर वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मात्र, लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी त्यांचा डाव सावरला. या दोघांनी ११२ धावांची अभेद्य भागीदारी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना थांबवण्यात आला त्यावेळी कर्नाटकाची २३ षटकांनंतर १ बाद १४६ अशी धावसंख्या होती.राहुल ५२, तर मयांक ६९ धावांवर नाबाद होता. यानंतर पावसामुळे खेळ सुरु होऊ शकला नाही आणि कर्नाटकाने व्हीजेडी नियमानुसार हा सामना ६० धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक – तामिळनाडू : ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ (मुकुंद ८५, अपराजित ६६; मिथुन ५/३४) पराभूत वि. कर्नाटक : २३ षटकांत १ बाद १४६ (अगरवाल नाबाद ६९, राहुल नाबाद ५२; सुंदर १/५१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -