घरक्रीडाकसोटींसाठी ठराविक ठिकाणांचा विराट कोहलीचा प्रस्ताव योग्यच!

कसोटींसाठी ठराविक ठिकाणांचा विराट कोहलीचा प्रस्ताव योग्यच!

Subscribe

भारतात कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आणि चाहत्यांना स्टेडियमकडे वळवण्यासाठी भारताने पाचच ठिकाणी कसोटी सामने खेळले पाहिजेत, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताने विशाखापट्टणम, पुणे आणि रांची येथे कसोटी सामने खेळले. या सामन्यांना फारसे प्रेक्षक उपस्थित नव्हते.

त्यामुळेच कोहलीने केवळ पाच ठिकाणी कसोटी सामने खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कोहलीचा हा प्रस्ताव योग्यच आहे, असे विधान भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने केले. १९८०, ९० च्या काळात बीसीसीआय नवीन वर्षाला कोलकाता येथे, तर पोंगलच्या वेळी चेन्नई येथे कसोटी सामन्यांचे आयोजन करत असत.

- Advertisement -

कोहलीचा प्रस्ताव योग्यच आहे. पाच ठिकाणीच सामने होत असल्यास कसोटी क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तसेच कोणत्या वेळी हे सामने होणार याचाही विचार झाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की, काही वर्षांपूर्वीपर्यंत पोंगलच्या वेळी चेन्नईमध्ये कसोटी सामने व्हायचे. नवीन क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीला कसोटी सामने दिल्ली, बंगळुरू, मुंबई किंवा कोलकाता येथे आयोजित केले जायचे.

क्रिकेटचा नवा मोसम सुरू होण्याआधीच लोकांना कसोटी सामने कुठे होणार हे माहीत असेल, तर ते सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतील. मी प्रशिक्षक होतो, तेव्हा आम्ही सहा नव्या ठिकाणांवर कसोटी सामने खेळलो. त्यापैकी केवळ इंदोर येथे झालेल्या सामन्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे कुंबळे म्हणाला.

- Advertisement -

भारताने डे-नाईट कसोटी सामने खेळावेत!

भारताने अजून एकही डे-नाईट (दिवस-रात्र) कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली डे-नाईट कसोटी खेळण्यास तयार आहे, अशी माहिती बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी दिली होती. भारताने डे-नाईट कसोटी सामने खेळले पाहिजेत, असे अनिल कुंबळेलाही वाटते. डे-नाईट कसोटी सामने पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये येतील. परंतु, हे सामने कोणत्या वेळेत होणार याचा विचार झाला पाहिजे. डे-नाईट एकदिवसीय सामन्यांमध्ये दव पडल्याने चेंडू ओला होत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत काळजी घेतली पाहिजे, असे कुंबळे म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -