घरक्रीडाविराटला विस्डेनचा सर्वोत्त्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार

विराटला विस्डेनचा सर्वोत्त्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वी २०१८ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला होता. आता क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखल्या जाणार्‍या विस्डेननेही विराटलाच सर्वोत्त्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला आहे. विराटला हा पुरस्कार मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. त्याचप्रमाणे विस्डेनच्या २०१८ वर्षांच्या ५ सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीतही त्याचा समावेश आहे. त्याच्यासोबत हा पुरस्कार इंग्लंडचे खेळाडू जॉस बटलर, सॅम करन, रोरी बर्न्स आणि इंग्लंड महिला संघाची खेळाडू टॅमी ब्यूमोन्ट यांनाही मिळाला आहे. तसेच भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

विराटने मागील वर्षी अफलातून प्रदर्शन केले होते. त्याने २०१८ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून खेळलेल्या ३७ सामन्यांच्या ४७ डावांत ६८.३७ च्या सरासरीने २७३५ धावा केल्या. यात ११ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश होता. खासकरून इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. विराटला २०१४ च्या दौर्‍यात १३४ धावाच करता आल्याने त्याच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र, त्याने मागील वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत ५ सामन्यांच्या १० डावांत ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या. यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता.
विराटच्या कामगिरीविषयी विस्डेनचे संपादक लॉरेंस बूथ म्हणाले, जरी संघाचा पराभव झाला असला, तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आणि त्यामुळे २०१४ मध्ये त्याला धावांसाठी झुंजावे लागले होते, हे सर्वांना विसरायला भाग पाडले. त्याची फलंदाजी, खासकरून इंग्लंडमध्ये फारच अफलातून होती आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने वेगळाच स्तर गाठला. भारताची स्मृती मानधना सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृतीने २०१८ मध्ये वनडेत ६६९ तर टी-२० मध्ये ६६२ धावा केल्या. तसेच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान सलग दुसर्‍या वर्षी टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -