घरक्रीडाविंडीजने उडवला पाकचा धुव्वा

विंडीजने उडवला पाकचा धुव्वा

Subscribe

७ विकेट, २१८ चेंडू राखून केली मात

ओशेन थॉमस आणि क्रिस गेलच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट आणि २१८ चेंडू राखून पराभव केला. थॉमसने ४ विकेट्स घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पडला आणि विश्वचषकाआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३ वेळा ३०० हून अधिक धावसंख्या उभारणार्‍या पाकिस्तानचा डाव अवघ्या १०५ धावांत आटोपला. १०६ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने १४व्या षटकात गाठत या विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.

या सामन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण असल्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांतच पाकिस्तानचे ३ फलंदाज माघारी पाठवत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावला. शेल्डन कॉटरलने इमाम-उल-हकला (२), तर आंद्रे रसेलने फखर झमान (२२) आणि हॅरिस सोहेल (८) यांना झटपट बाद केल्याने पाकिस्तानची ३ बाद ४५ अशी अवस्था झाली. यानंतरही पाकिस्तानच्या ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. बाबर आझम (२२), मोहम्मद हाफिज (१६) आणि वहाब रियाझ (१८) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता न आल्याने पाकिस्तानचा डाव २२ व्या षटकात १०५ धावांवर आटोपला. विंडीजचा युवा गोलंदाज थॉमसने २७ धावांतच ४ विकेट्स घेतल्या. त्याला होल्डरने ३ विकेट्स आणि रसेलने २ विकेट्स घेत चांगली साथ दिली.

- Advertisement -

१०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शाई होप आणि क्रिस गेल या विंडीजच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. गेलने हसन अलीच्या पहिल्या २ षटकांत २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यामुळे ४ षटकांनंतर विंडीजची बिनबाद ३२ अशी धावसंख्या होती. मात्र, पुढच्याच षटकात ११ धावांवर होपला मोहम्मद आमिरने बाद करत विंडीजला पहिला झटका दिला, तर आमिरनेच तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या डॅरेन ब्रावोला खातेही उघडू दिले नाही. गेलने मात्र आपली आक्रमक फलंदाजी सुरु ठेवत ३३ चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमधील आपले ५२वे अर्धशतक पूर्ण केले. पण, आमिरने पुन्हा आपली जादू चालवत गेलला ५० धावांवर माघारी पाठवले. यानंतर निकोलस पूरनने अवघ्या १९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३४ धावा करत दोन वेळा विश्वविजेत्या विंडीजला सामना जिंकवून दिला.

पाकिस्तान : २१.४ षटकांत सर्वबाद १०५ (फखर झमान २२, बाबर आझम २२; ओशेन थॉमस ४/२७, जेसन होल्डर ३/४२) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १३.४ षटकांत ३ बाद १०८ (क्रिस गेल ५०, निकोलस पूरन नाबाद ३४; मोहम्मद आमिर ३/२६).

- Advertisement -

वर्ल्डकपमध्येही गेलच सिक्सर किंग

विंडीजचा सलामीवीर क्रिस गेलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तो क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकात लागवणारा फलंदाज झाला. गेलने विश्वचषकात २७ सामन्यांत ४० षटकार लगावले आहेत. याआधी विश्वचषकात सर्वाधिक षटकार लागवण्याचा विक्रम द.आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डी व्हिलियर्सच्या नावे होता. त्याने २३ सामन्यांत ३७ षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (५२०) मारण्याचा विक्रमही गेलच्याच नावे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -