घरक्रीडा‘आयपीएल’ स्टार्सची विश्वचषकात कसोटी

‘आयपीएल’ स्टार्सची विश्वचषकात कसोटी

Subscribe

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपली दावेदारी सिद्ध करण्याच्या इराद्याने उतरणार्‍या अफगाणिस्तानसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमध्ये अल्पावधीतच चांगला नावलौकिक मिळवणार्‍या अफगाणने आजवर केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. आयपीएल स्पर्धेत अफगाणिस्तानची फिरकी जोडगोळी राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी दमदार प्रदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्कस स्टोइनिस या स्टार खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आयपीएल गाजवली, परंतु एकदिवसीय विश्वचषकाचा दर्जा याहीपेक्षा कित्येक पटीने आव्हानात्मक असल्याने खर्‍या अर्थाने आता या खेळाडूंची क्षमता कळणार आहे.

आजवरच्या विश्वचषक स्पर्धांत सर्वाधिक किताब पटकावणार्‍या कांगारूंपुढे दुसर्‍यांदा विश्वचषकात खेळणार्‍या अफगाणिस्तानला तुलनेने अधिक सरस खेळ करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना अधिक मोठे आव्हान ठरणार आहे. तुलनात्मकदृष्ठ्या ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत दिसत असला, तरी अफगाणिस्तानने आजवर विविध देशांसोबत खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत सांघिक कामगिरीच्या जोरावर दर्जेदार कामगिरी केली आहे. राशिद खान, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, मुजीब उर रहमान, नूरअली झादरन, मोहम्मद शहजाद या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्याच नजरा राहतील. या विश्वचषक स्पर्धेत नवख्या अफगाणसमोर अनेक आव्हाने असतील, याउलट अनेक स्टार्स अन् फॉर्मातील खेळाडूंचा भरणा असलेल्या कांगारूंना आत्मविश्वास दुणावण्याची संधी या सामन्यातून मिळू शकते. ब्रिस्टलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर अफगाणचा फिरकी मारा कांगारूंना कितपत रोखू शकतो, हे पाहणे रंजक ठरेल. नबी आणि राशिद यांच्यावर अफगाणची भिस्त असली तरी कांगारूंचा लांबलचक फलंदाजी क्रम आणि खेळाडूंचा फॉर्म पाहता अफगाणला घाम गाळावा लागणार यात शंका नाही.

- Advertisement -

जायंट किलर राशिद खान…
आयपीएलसह आंतरराष्ट्रीय सामन्यांत आपल्या जादुई फिरकीने भल्याभल्यांना नाचवणारा राशिद खान विश्वचषकात ‘जायंट किलर’ ठरू शकतो. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या विजयांमध्ये अनेकदा मोलाचे योगदान देणार्‍या राशिदने फलंदाजीतही आपली चुणूक दाखवली आहे. मधल्या फळीत भरवशाची फलंदाजी करतानाच अखेरच्या षटकांत मोठे फटके मारण्याचे सामर्थ्यही असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

वर्ल्डकप स्पेशल
अ‍ॅरॉन फिंच, डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, नेथन लायन यासारख्या तगड्या खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलिया संघ अत्यंत मजबूत वाटतो, पण कुठल्याही क्षणी सामना फिरवणारे खेळाडू अफगाणिस्तानच्या चमूत असल्याने त्यांना कमी लेखणे विश्वचषकात कोणत्याही संघाला महागात पडू शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो, त्यामुळेच प्रत्यक्षात अनुभवी खेळाडू सरस ठरतात की दुबळा मानला जाणारा अफगाण चमत्कार करण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

- Advertisement -

– साईप्रसाद पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -