घरक्रीडातेजतर्रार शमी...

तेजतर्रार शमी…

Subscribe

विश्वचषक २०१९ मध्ये फिरकीपटूंपेक्षा जलदगती गोलंदाजांचाच दबदबा अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत जवळपास सर्वच देशांच्या वेगवान गोलंदाजांना चांगले यश मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडसह भारताच्या वेगवान गोलंदाजांनी या विश्वचषक स्पर्धेत जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

यात विक्रमाला गवसणी घालणार्या भारताच्या तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आजवर ११ विश्वचषक सामन्यांत त्याने ३१ बळी घेत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विश्वचषकात भुवनेश्वरला दुखापत झाल्यामुळे त्याला संधी मिळताच केवळ चार सामन्यांत १४ बळी टिपत त्याने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

- Advertisement -

बंगालच्या या २८ वर्षीय उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने या विश्वचषकात आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याने यजमानांविरुद्धच्या सामन्यात ६७ धावा देत ५ बळी घेतले. तर अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यातही अंतिम षटकात त्याने हॅटट्रिक घेत भारताला विजय मिळवून दिला. शमीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत केवळ १६ धावांत ४ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात मोहम्मद शमी हा हॅटट्रिक घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी १९८७ मध्ये झालेल्या विश्वचषकात चेतन शर्मा हॅटट्रिक घेणारे पहिले भारतीय गोलंदाज होते. त्याचबरोबर सलग तीन सामन्यांत किमान चार बळी घेणारा शमी पहिलाच भारतीय गोलंदाच आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाला दुखापतग्रस्त भुवनेश्वरची कमी जाणवली नाही. आता बाद फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय संघाला आता यापुढील सामन्यांतही शमीकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे, यात शंका नाही.

- Advertisement -

दृष्टिक्षेपात…

मागील (२०१५) विश्वचषकात शमीने भारताकडून सर्वाधिक बळी घेतले होते. त्याने आजवर ६७ एकदिवसीय सामन्यांत १२७ गडी बाद केले आहेत. त्याने ८ वेळा चार बळी घेण्याची कामगिरी केली आहे. विश्वचषकच्या इतिहासातही शमीने ११ सामन्यांत ३१ बळी घेतले आहेत. सर्वात जलद २५ बळी घेण्याची कामगिरीही त्याने केली आहे. भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे दोघे ४४-४४ बळींसह प्रथम स्थानी आहेत. शमीने सलग तीन सामन्यांत चार किंवा त्याहून अधिक बळी घेतले. यापूर्वी नरेंद्र हिरवानी यांनी १९८८ मध्ये सलग तीन वेळा ४ बळी घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -