आयपीएलचा मोह पडला महागात?

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बीसीसीआय फारसे महत्त्व देताना दिसले नाहीत. त्यांना आयपीएल स्पर्धेचा मोह आवरता आला नाही. बीसीसीआयने ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयपीएलचे आयोजन केले होते. म्हणजेच खेळाडूंना विश्रांती आणि जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला होता. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएलचा मोसम ४ मे रोजी स्थगित करणे भाग पडले होते. मात्र, त्यानंतरही भारताचे खेळाडू आधी ठरल्याप्रमाणेच ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे १८ जूनपासून सुरु झालेल्या अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्याची त्यांना फारशी संधी मिळाली नाही.

wtc final new zealand beat virat kohli and team india
न्यूझीलंड अंतिम सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरला, पण भारत?

‘आम्ही याआधी काही ठिकाणी सामन्याच्या केवळ तीन दिवसांपूर्वी पोहोचलो आहोत. परंतु, त्यानंतरही आम्हाला सामने जिंकण्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला झुंज देण्यात यश आले आहे. त्यामुळे सराव करण्याची फारशी संधी मिळणार नसली तरी त्याची आम्हाला फारशी चिंता नाही. इंग्लंडमध्ये खेळण्याची ही आमची पहिली वेळ नाही. आम्हाला तेथील वातावरण आणि परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे,’ असे भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडसाठी रवाना होण्यापूर्वी म्हणाला होता.

भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट राखून पराभूत केले. या ऐतिहासिक विजयासह केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपदाची गदा आपल्या नावे केली. न्यूझीलंडला २०१५ आणि २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१९ वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना बरोबरीत राहिल्यानंतरही कमी चौकार-षटकार मारल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला आणि यजमान इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही पावसामुळे न्यूझीलंडला जेतेपदापासून वंचित राहावे लागणार असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, पाचव्या आणि सहाव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने पूर्ण दिवसाचा खेळ झाला. या दोन दिवसांत न्यूझीलंडने फलंदाजी आणि विशेषतः गोलंदाजीत भारतापेक्षा दर्जेदार खेळ करत पहिलेवहिले ‘टेस्ट चॅम्पियन’ होण्याचा मान पटकावला. न्यूझीलंडचे हे क्रिकेट इतिहासातील पहिलेच जगज्जेतेपद ठरले.

दुसरीकडे भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारताने ६१ पैकी ३६ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वातच भारतीय संघाला सलग पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्यात यश आले. परंतु, कोहलीची ही जादू आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये चालू शकलेली नाही. कोहली कर्णधार असताना भारताने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी, तर २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली होती. परंतु, या दोन्ही सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला होता.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कोहलीला कर्णधार म्हणून हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, त्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वावर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, कोहलीने या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून फारशा चुका केल्या असे म्हणता येणार नाही. मात्र, त्याने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी केलेल्या विधानाचा, तसेच त्याने आणि संघ व्यवस्थापनाने मिळून अंतिम सामन्यासाठी केलेल्या संघनिवडीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्याची फारशी संधी मिळणार नसली, तरी त्याची आम्हाला चिंता नसल्याचे कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बोलून दाखवले होते. कसोटी हा क्रिकेटचा सर्वात पारंपरिक आणि अवघड प्रकार आहे. कोहलीने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य दिले आहे. कसोटीत चांगली कामगिरी केल्यावर वेगळेच समाधान मिळत असल्याचे तो वारंवार सांगतो. मग असे असतानाही पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी पुरेसा सराव मिळावा असे त्याला वाटू नये?

साऊथहॅम्पटन येथे झालेल्या या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. त्यांना ही मालिका १-० अशी जिंकण्यातही यश आले होते. तसेच या दोन सामन्यांत मिळून त्यांनी तब्बल १७ खेळाडूंना (दुसऱ्या सामन्यासाठी संघात सहा बदल केले) संधी दिली होती. त्यामुळे त्यांचे सर्वच प्रमुख खेळाडू मॅच-फिट होते. त्यांना इंग्लंडमधील परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची पुरेशी संधी मिळाली होती. याऊलट भारतीय संघाने अंतिम सामन्यापूर्वी केवळ एक सराव सामना खेळला, तोही आपापसात!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला फारसे महत्त्व देताना दिसले नाहीत. त्यांना आयपीएल स्पर्धेचा मोह आवरता आला नाही. बीसीसीआयने ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन केले होते. म्हणजेच खेळाडूंना विश्रांती आणि अंतिम सामन्याच्या तयारीसाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला होता. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएलचा मोसम ४ मे रोजी स्थगित करणे भाग पडले होते. मात्र, त्यानंतरही भारताचे खेळाडू आधी ठरल्याप्रमाणेच ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे त्यांना सराव करण्यासाठी फारशी संधीच मिळाली नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख (१८ ते २२ जून आणि २३ जून राखीव दिवस) ही आधीच ठरलेली होती. मात्र, तरीही आयपीएलचे वेळापत्रक तयार करताना बीसीसीआयने या गोष्टीचा फारसा विचार केला नाही. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळू शकतो, तर भारतीय संघाला कसोटी सामना नाही, पण इंग्लंडमधील स्थानिक संघाशी एखादा प्रथम श्रेणी खेळण्याची संधी मिळावी, असे बीसीसीआयला का वाटले नाही? पुरेसा सराव न मिळाल्याचा विशेषतः भारताच्या वेगवान गोलंदाजांना चांगलाच फटका बसला.

अंतिम सामन्यात भारताच्या सर्व फलंदाजांना न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. याऊलट भारताला दोन डावांत मिळून न्यूझीलंडच्या केवळ १२ विकेट घेता आल्या आणि यापैकी ५ विकेट या फिरकीपटूंनी (अश्विन चार आणि जाडेजा एक विकेट) घेतल्या. जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, अंतिम सामन्यात त्याला दोन डावांत मिळून ३६ षटकांत एकही विकेट घेता आली नाही. अंतिम सामन्यापूर्वी एखाद्या सराव सामन्याचा त्याला फायदा झाला नसता?

तसेच कोहली आणि शास्त्री या कर्णधार-प्रशिक्षक जोडगोळीने मागील काही काळात कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भारताने अंतिम सामन्यासाठी अश्विन आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. परंतु, ढगाळ वातावरण आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी या गोष्टींचा विचार करता भारताला एक अतिरिक्त फलंदाज किंवा वेगवान गोलंदाजाला संधी देणे फायदेशीर ठरू शकले असते.

अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला, पण त्यांच्यासाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. भारताच्या फलंदाजांना खेळपट्टीवर बराच काळ उभे राहण्यात यश आले. भारताच्या एकाही फलंदाजाने या सामन्यात अर्धशतक केले नाही. परंतु, भारताने पहिल्या डावात ९२.१ षटके, तर दुसऱ्या डावात ७३ षटके खेळून काढली. तसेच आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे ऑफस्पिनर अश्विनची कामगिरी. अश्विनच्या परदेशातील कामगिरीवर नेहमीच टीका केली जाते. परंतु, अंतिम सामन्यात त्याने टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना विशेषतः दुसऱ्या डावात अडचणीत टाकले. त्याला सामन्यात चार विकेटही घेण्यात यश आले. या गोष्टींचा आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला फायदा होईल आणि ते अंतिम सामन्यात केलेल्या चुकांमधून धडा घेतली हीच आशा!