घरक्रीडा‘यशस्वी’ वाटचाल, मुंबईकर सलामीवीरांची!

‘यशस्वी’ वाटचाल, मुंबईकर सलामीवीरांची!

Subscribe

यशस्वीच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली ती २०१३ मध्ये! प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी एका शिबिरात यशस्वीला नेट्समध्ये खेळताना पाहिले. त्याच्या फलंदाजीने सिंग खूप प्रभावित झाले आणि त्यांनी यशस्वीला पाठबळ दिले. त्यांनी यशस्वीला त्यांच्या घरी राहण्यास बोलावले. तसेच त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. विविध वयोगटांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने भारताच्या १९ वर्षांखालील आणि मुंबईच्या संघात स्थान मिळवले.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावाहून शहरात येणे, पडेल ते काम करणे, एका व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे आणि अपार मेहनतीमुळे आपले स्वप्न साकार करणे; हे वाचून तुम्हाला एखाद्या चित्रपटाची गोष्ट असल्यासारखे वाटू शकेल. मात्र, ही चित्रपटाची नाही, तर भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या आयुष्याची कहाणी आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ! त्यामुळे जवळपास प्रत्येक भारतीयच क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगतो. परंतु, फार थोडेच जण हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत घेतात आणि यापैकीच एक म्हणजे यशस्वी!

आपल्या क्रिकेट आणि महान सचिन तेंडुलकरवरील प्रेमापोटी यशस्वी जैस्वाल काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या भदोहीहून मुंबईत आला. मात्र, त्याला सुरुवातीच्या काळात बर्‍याच अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्याला डेअरीमध्ये झोपावे लागले. त्यानंतर पालकांच्या सांगण्यावरून तो काही दिवस काकांकडे राहिला. परंतु, त्यांचे घर लहान असल्याने यशस्वीला तिथेही फार काळ राहता आले नाही. काकांनी त्याला मुस्लीम युनायटेड क्लबबाबत सांगितले. या क्लबच्या तंबूमध्ये त्याने तीन वर्षे काढली. मात्र, तिथे खाण्यासाठी पैसे अपुरे पडू लागल्याने यशस्वीने राम लीलाच्या वेळी पाणी पुरी विकण्यास सुरुवात केली. तसेच त्याने स्कोरर, बॉल बॉय म्हणूनही काम केले.

- Advertisement -

यशस्वीच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली ती २०१३ मध्ये! प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी एका शिबिरात यशस्वीला नेट्समध्ये खेळताना पाहिले. त्याच्या फलंदाजीने सिंग खूप प्रभावित झाले आणि त्यांनी यशस्वीला पाठबळ दिले. त्यांनी यशस्वीला त्यांच्या घरी राहण्यास बोलावले. तसेच त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. विविध वयोगटांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने भारताच्या १९ वर्षांखालील आणि मुंबईच्या संघात स्थान मिळवले.

त्याची जगाला खरी ओळख झाली, ती २०१८ सालच्या १९ वर्षांखालील आशिया चषकात. भारताने विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आणि यशस्वीने ३ सामन्यांत सर्वाधिक २१४ धावा करत भारताच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. खासकरून त्याने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८५ धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय स्पर्धा विजय हजारे करंडकाचा मागील मोसम यशस्वीसाठी अविस्मरणीय ठरला. त्याने या स्पर्धेच्या ६ सामन्यांत ११२.८० च्या सरासरीने ५६४ धावा चोपून काढल्या. याच स्पर्धेत झारखंडविरुद्ध त्याने १५४ चेंडूत २०३ धावांची खेळी केली. अवघ्या सहा वर्षांपूर्वी क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेला यशस्वी, वयाच्या १७ व्या वर्षी स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

- Advertisement -

यशस्वीने आपला चांगला फॉर्म दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्येही कायम ठेवला आहे. चार वेळच्या विश्वविजेत्या भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताच्या या यशात यशस्वीचा मोलाचा वाटा आहे. ही स्पर्धा सुरु होण्याआधी यशस्वीकडून भारतीय चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या. त्यानेही ५ सामन्यांत १५६ च्या सरासरीने ३१२ धावा या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यातच त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार शतक करत आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाला सामोरे जाऊ शकतो, हे ‘पुन्हा एकदा’ दाखवून दिले.

यशस्वीला या वर्ल्डकपमध्ये त्याचा सलामीचा साथी आणि मुंबईकर सहकारी दिव्यांश सक्सेनाची तोलामोलाची साथ लाभली आहे. चेंबूरच्या अणुशक्ती नगरला राहणार्‍या दिव्यांशचा इथपर्यंतचा प्रवास फार कमी लोकांना माहित आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम करणार्‍या दिव्यांशच्या वडिलांनी त्याला माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला खेळ आणि अभ्यास यांच्यात ताळमेळ सांभाळणे दिव्यांशला अवघड जात होते. मात्र, क्रिकेटपटू बनण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची त्याची तयारी होती. दिलीप वेंगसरकर अकादमीत प्रशिक्षण घेणार्‍या दिव्यांशने मुंबईकडून १४ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातविरुद्ध द्विशतकी खेळी केली. तर पुढे त्याने १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडकात ५०५ धावा फटकावल्या.

दादर युनियन, वेंगसरकर अकादमी आणि मुंबईच्या विविध वयोगटांतील संघांकडून केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर डावखुर्‍या दिव्यांशने भारताच्या १९ वर्षांखालील संघात प्रवेश मिळवला. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतासाठी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या ६ सामन्यांत सर्वाधिक ३२१ धावा करत भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले. यशस्वी आणि कर्णधार प्रियम गर्गसोबत दिव्यांश भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ झाला. आता दिव्यांश आणि यशस्वी हे मुंबईकर सलामीवीर रविवारी बांगलादेशविरुद्धचा अंतिम अडथळा पार करुन भारताला विक्रमी पाचव्यांदा विश्वविजेता बनवतील, अशी आशा भारतीय चाहते करत आहेत हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -