घरठाणेबदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम संथ गतीने

बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम संथ गतीने

Subscribe

बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत असून ऑक्टोबर महिन्यात होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र ऑक्टोबर उलटून वर्ष 2023 ची अखेर आल्यानंतरही होम प्लॅटफॉर्मच्या कामाला काही गती मिळतांना दिसत नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत. लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बदलापूर शहरातील लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला जुना प्लॅटफॉर्म, रेल्वे पादचारी पूल कमी पडत आहे. हजारो प्रवाशांना रोज जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या मागणीनंतर होम प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी देत 2019 साली बदलापूर होम प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरवात केली होती. मात्र येथील जागेचा ताबा आणि इतर तांत्रिक बाबींमुळे होम प्लॅटफॉर्मच्या कामाला विलंब झाला होता.

- Advertisement -

त्यात होम प्लॅटफॉर्मला लागून असलेला स्कायवॉक, त्याखालील दुकाने, रिक्षा स्टॅण्ड आदींचाही या कामात अडथळा दूर करण्यात रेल्वे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे मागच्या पाच वर्षे होम प्लॅटफॉर्मचे काम धीमेगतीने सुरू होते. दरम्यान याच काळात अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्म तयार होवून रेल्वे प्रवाशांच्या सेवेतही आला. त्यामुळे बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मबाबत बदलापूरातील रेल्वे प्रवाशांकडून मोठी टीका होऊ लागली. अखेर वाढता विरोध पाहता लोकप्रतिनिधी आणि रेल्वे संघटनांच्या पाठपुराव्यानंतर ऑक्टोबर महिन्यात होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र डिसेंबर उजाडूनही होम प्लॅटफॉर्मचे काम संथगतीने सुरू असल्याने बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -