दिव्यात सुषमा स्वराज पुरस्कार देत महिलादिन साजरा

दिवा शहरात कार्यरत असलेल्या महिलांसह आगासण गाव, बेतवडे गावं दातिवली, मुंब्रा कॉलनी, म्हात्रे गेट, साबेगाव, गणेश पाडा, बी आर नगर खर्डी गाव, उसरघर गाव विविध भागातून महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. विशेष करून लोणचे पापडचा व्यवसाय करणाऱ्या ७५ वर्षीय सुभद्रा शिंदे या आजीबाईंना ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष मृणालताई पेंडसे यांच्या हस्ते स्वर्गीय सुषमा स्वराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे दिवा भाजप महिला अध्यक्षा ज्योती पाटील, भाजप दिवा मंडळ व तन्वी फाउंडेशनच्या वतीने नुकताच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यातील महिलांचा सन्मान सोहळा शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी, मृणाल पेंडसे यांनी ज्योती पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच दिव्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केवळ ज्योती पाटील करत असल्याचे आवर्जून सांगितले. तर रोहिदास मुंडे यांनी दिव्यात भारतीय जनता पार्टीचे आठही नगरसेवक निवडून आणण्यासाठी महिलांनी निर्धार करावा असे आवाहन करत, दिव्यातील महिला अनेक समस्यांचा सामना करत असतात या समस्या सोडवण्यासाठी आता महिलांनी एकजूट व्हावे असे ते म्हणाले. याप्रसंगी दिव्यातील विविध बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.