ठाणे महापालिका, ग्रामीण भागातील कर्मचा-यांचे आंदोलन

ठाणे महापालिकेतील कर्मचार्‍यांची केवळ निदर्शने

ठाणे महापालिकेतील कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचेच दिसून आले. त्या कर्मचार्‍यांनी मंगळवारी मुख्यालयासमोर केवळ निदर्शने केले. त्यानंतर महापालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान आज आंदोलनाचा महापालिकेच्या कारभार कोणताच परिणाम झाला नाही. महापालिकेचा कारभार सुरळीत सुरू होता. दरम्यान संपाऐवजी केवळ निदर्शने करणार असल्याचे स्पष्टीकरण संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले. दुसरीकडे या संपात सहभागी झाले नसले तरी कोणते कर्मचारी गैरहजर आहेत आणि ते कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत का याची माहिती घेण्याचे काम ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू होते.

कल्याण तालुक्यात संप चिघळल्यास कामावर गंभीर परिणामांची शक्यता
एकच मिशन जुनी पेन्शन,अशा घोषणा देत मंगळवारी कल्याण तालुक्यातील पंचायत समितीचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. संप असाच चालू राहिल्यास मात्र याचा गंभीर परिणाम विविध सेवावर होऊ शकतो.
एकच मिशन, जुनी पेन्शन ची हाक राज्य कर्मचारी संघटनेने दिली सुमारे19 लाख कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी, मदतनीस, शिक्षकेत्तर कर्मचारी अशा सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. संपूर्ण राज्यभर कर्मचारी संपावर गेले आहेत. सकाळी कल्याण पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या कर्मचार्‍यांनी पंचायत समितीच्या आवारात एकत्र येऊन एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, या सरकारचे करायचे काय?खाली डोक वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला,यावेळी सर्व कर्मचारी बसून राहिले होते, कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे, तरीही गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी पंचायत समितीच्या विभाग प्रमुखांना बोलावून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

कल्याण तालुक्यातील काही मोजके ग्रामपंचायत कार्यालये उघडी असली तरी, बहुतांश शाळा मात्र बंद होत्या, अशीच परिस्थिती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे दिसून आली. रुग्णालयाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून यामुळे काही प्रमाणात याचा परिणाम रुग्ण सेवेवर झाला आहे. सर्व आरोग्य कर्मचारी, नर्स,शिपाई, डॉक्टर आदींनी रुग्णालयाबाहेर येवून एकच मिशन,जुनी पेन्शन, या सरकारचे करायचे काय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या, तर एक आमदार, खासदार पाच वर्षासाठी निवडून आले तर आयुष्यभर 50 हजारापर्यंत पेन्शन घेतात, मग आम्ही 40/50 वर्षे सेवा केली मग आम्हाला, आमच्या मुलाबाळांची सोय का नको व्हायला असे एका कर्मचार्‍यांने सांगितले.
दरम्यान कर्मचारी संपाचा पहिला दिवस आहे, वरीष्ठांच्या दबावामुळे जरी काही कार्यालये उघडी असलीतरी, दवाखाने उघडे असलेतरी मात्र संप असाच चालू राहिला तर याचा गंभीर परिणाम विविध सेवा व शासकीय, निमशासकीय कार्यालयावर होऊ शकतो.

शहापुरातील कर्मचार्‍यांची रॅली
एकच मिशन जुनी पेन्शन चा बुलंद नारा देत शहापूर तालुक्यातील कर्मचारीही बेमुदत संपात सहभागी झाले. कोण म्हणतो देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा विविध घोषणा देत शहापूर पंचायत समिती ते तहसील कार्यालय रॅली काढण्यात आली. या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात शहापुरातील पंचायत समिती कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, पशुसंवर्धन, बांधकाम, महिला व बाल कल्याण, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, शिपाई, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. यावेळी सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी पंचायत समिती ते तहसील कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.