घरठाणेनागरिकांनी एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करुन पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा

नागरिकांनी एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करुन पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा

Subscribe

जागतिक पर्यावरण दिनी ठाणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे आवाहन

निसर्गातील पंचमहाभूतांचे संरक्षण व संवर्धन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याबाबत सांगून नागरिकांनी याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच शहरातील कचरा सफाई करणा-या व्यक्ती / कर्मचारी हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यांना आदराची वागणूक देणे गरजेचे आहे, तसेच नागरिकांनी देखील ‘ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा’ वेगवेगळा करा एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करुन जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साधनांचा वापर करण्याचे आवाहन  अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी  केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त तुषार पवार, अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, मुंबई ग्राहक पंचायतीचे प्रकाश गव्हाणे, पराग रेडकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादशिक अधिकारी शेख, समर्थ भारत व्यासपीठचे उल्हास कार्ले, भटू सावंत, आर निसर्ग फाऊंडेशनच्या डॉ. लता घनश्यामनानी यांच्यासह पर्यावरण विषयक काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षीच्या संकल्पनेनुसार “प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना” या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व ठाणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येणा-या पर्यावरणपूरक उपक्रम व केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या मिशन लाईफ उपक्रमाबाबत विस्तृत माहिती दिली. तद्नंतर मुंबई ग्राहक पंचायत, ठाणे विभागाचे अध्यक्ष प्रकाश रा. गव्हाणे यांनी पर्यावरणपूरक वितरण व्यवस्था तसेच शास्वत विकासाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुंबई ग्राहक पंचायत ही गत ४८ वर्षांपासून पर्यावरणपूरक वितरण व्यवस्था राबवित असून धान्याकरिता कापडी पिशवीच्या वापराचा पुरस्कार करत आहे. या चळवळीमध्ये अधिकतम नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच, ई-कॉमर्सचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुंबई ग्राहक पंचायत, ठाणे विभागाचे पर्यावरण विभागप्रमुख  पराग रेडकर यांनी एकल वापर प्लास्टिक व ग्राहकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 47 RRR केंद्रे सुरू करण्यात आली आहे. Reduce, Reuse & Recycle  म्हणजेच नागरिकांनी आपल्या घरातील वापरण्यास योग्य कपडे, पादत्राणे, लहान मुलांची खेळणी या केंद्रामध्ये जमा करण्यास सुरूवात केली आहे. या केंद्राना नागरिकांचा उत्‌स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी नमूद करीत आतापर्यत सर्व केंद्रामध्ये एकूण ६ हजार किलो साहित्य जमा झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांचेद्वारे संयुक्तपणे मागील एक दशकाहून अधिक कालावधीत राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कार्ले यांनी माहिती दिली. तसेच आर-निसर्ग संस्थेच्या डॉ. लता घनश्यामनानी यांनी महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या “फॉलो द मंकी” हे गांधीजीचे सूत्र पर्यावरणासाठी वापरा म्हणजेच ‘ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा’ वेगवेगळा करा ही संकल्पना स्पष्ट केली व या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी परिचलनाबाबत माहिती देऊन ठाणे शहरातील 5000 हून अधिक कुटुंब सहभागी असल्याबाबत माहिती दिली.

यावेळी आरआरआर केंद्र यशस्वीपणे कार्यरत ठेवणाऱ्या  पार्कवुड सोसायटी, नित्यश्री संस्था, लोढा अमारा, हॅप्पी व्हॅली, निहारिका, रहेजा गार्डन, कोरस टॉवर, प्रिन्सटन हिरानंदानी, कोरल हाईट्स, कॉसमॉस हिल्स, निळकंठ ग्रीन या गृहसंस्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच समर्थ भारत व्यासपीठ यांचेद्वारे सुरु करण्यात आलेल्या ई-मॅगझीनचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरणपूरक शपथ घेऊन ती शपथ पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -