घरठाणेकाल्हेर ते ताडाळी जलवाहिनीच्या रस्त्याची दुरावस्था

काल्हेर ते ताडाळी जलवाहिनीच्या रस्त्याची दुरावस्था

Subscribe

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी भिवंडी तालुक्यातून जाते. या जलवाहिनीच्या तपासणीसाठी आणि लक्ष्य ठेवण्यासाठी महानगरपालिकेने जलवाहिनीलगत रस्ता बनविलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खाजगी वाहतूक सुरु झाल्याने या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तालुक्यातील काल्हेर पासून ते ताडाळी पर्यंतच्या पाईपलाईन रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी,अशी मागणी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता श्रीधर चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने जलवाहिनीलगत रस्ता बनविल्याने या मार्गावर खाजगी वाहनांना जाण्यास बंदी होती. त्यांनी या रस्त्याचा वापर करू नये म्हणून मुंबई मनपाने या मार्गावर ठिकठिकाणी चेकपोस्ट ठेवले होते. मात्र जलवाहिनीच्या मार्गावर असलेल्या ग्रामस्थांना या रस्त्याचा वापर करण्याची मुभा होती. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गोदामे झाल्याने या महानगरपालिकेच्या मार्गावरून खाजगी व जड वाहने सर्रासपणे जाऊ लागली. त्यामुळे काल्हेर ते ताडाली जलवाहिनीच्या रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली. परिसरातील ग्रामीण नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना, गर्भवती महिला व शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने त्यांना याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

मात्र रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी यासंदर्भात गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुमित म्हात्रे यांनी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता चौधरी यांची सोमवारी भेट घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात येणार असून मनपा अतिरिक्त आयुक्तांकडे या संदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठवण्यात येईल,असे आश्वासन उप अभियंता चौधरी यांनी सुमित म्हात्रे व शिष्टमंडळास दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -