घरठाणेउद्योजकांसह सर्व ग्राहकांच्या सुलभ सेवांसाठी महावितरण कटिबद्ध

उद्योजकांसह सर्व ग्राहकांच्या सुलभ सेवांसाठी महावितरण कटिबद्ध

Subscribe

महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचे प्रतिपादन

औद्योगिक ग्राहक हा महावितरणच्या महसुलाचा मजबूत कणा आहे. वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे कोणत्याही उद्योगांना फटका बसू नये, ही महावितरणची प्राथमिकता आहे. तर उद्योजकांसह सर्वच वीज ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबिल तक्रारी इत्यादी सेवांमध्ये कोणतीही कमतरता नसावी असे ‘झिरो टॉलरन्स’ हे महावितरणचे धोरण असून त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामात अधिक सुसूत्रता व सुलभता आणावी. यात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले.

महावितरणच्या कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत सर्व औदयोगिक वीज ग्राहकांसाठी (कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड, शहापूर) कल्याण पश्चिमेतील तेजश्री इमारतीच्या तळमजल्यावर स्वतंत्र स्वागत कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या सुसज्ज अशा स्वागत कक्षाचे शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी उद्घाटन करताना संचालक (संचालन) ताकसांडे बोलत होते. याप्रसंगी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्षेत्रातील सर्वच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संचालक (संचालन) ताकसांडे यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

- Advertisement -

संचालक (संचालन) ताकसांडे म्हणाले, जवळपास ३९ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या केंद्र सरकारच्या ‘आरडीएसएस’ योजनेतून राज्याच्या वीजुपरवठा यंत्रणेत अमुलाग्र बदल होणार आहेत. या योजनेतील कामांच्या निविदा प्रक्रियांना सुरूवात झाली आहे. वीज वितरण क्षेत्रात देशातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी म्हणून महावितरण समर्थपणे उभी असून वार्षिक एक लाख कोटी महसूलापर्यंतची मजल कंपनीने गाठली आहे. तर केंद्र सरकारने आदिम जमातींना वीज पुरवठा करण्यासाठी दिलेले उद्दिष्ट महावितरणने अवघ्या ३ आठवड्यात पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, दीपक पाटील, दिलीप भोळे, महेश अंचिनमाने, संदीप पाटील, विजय मोरे, विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी, अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.

स्वागत कक्ष संपर्क क्रमांक व ईमेल
औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वागत कक्षाला संपर्क करण्यासाठी औद्योगिक वीज ग्राहकांनी ८८७९६२६८२२ या क्रमांकावर किंवा [email protected] ईमेलचा उपयोग करावा. स्वागत कक्षाचे प्रमुख म्हणून कल्याण मंडल एकचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) तसेच सोबतीला सहाय्यक लेखापाल, उच्चस्तर लिपिक (वित्त व लेखा) व दोन बाह्यस्त्रोत कर्मचारी राहणार आहेत. या कक्षाकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारीचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी संबंधितांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -