घरठाणेबदलापुरात पालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

बदलापुरात पालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

Subscribe

सुमारे ५० हून अधिक लहानमोठी अतिक्रमणे भुईसपाट

कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे करून दुकाने, टपऱ्या थाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारी बदलापूर पश्चिम भागात अतिक्रमणे हटविल्यानंतर लवकरच बदलापूर पूर्व भागातही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रधासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बुधवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार सुदर्शन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम भागात बेलवली, मांजर्ली, सोनीवली, एसटी स्टॅन्ड, रमेशवाडी येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. मांजर्ली येथील ग्रीनवूड संकुलाजवळ आणि एसटी स्टॅन्डजवळील आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दुकानांवर त्याचप्रमाणे सोनीवली येथील बीएसयुपी घरकुल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळच्या आरक्षित भूखंडावर केलेल्या अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे रमेशवाडी येथे टाटा पॉवरच्या जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या दुकानवजा टपऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करून सुमारे ५० हून अधिक लहानमोठी अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट केली.

- Advertisement -

कारवाईच्या धास्तीने पूर्व भागात फेरीवाले गायब
कुळगाव बदलापूर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाईची मोहीम गुरुवारी बदलापूर पूर्व भागात राबविण्यात येणार होती. परंतु पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने ही कारवाई झाली नसल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र या कारवाईच्या धास्तीने अनेक फेरीवाले आणि किरकोळ विक्रेते गुरुवारी विक्रीसाठी न आल्याने रस्ते मोकळे दिसत होते.

कारवाईत सातत्य ठेवण्याची नागरिकांची अपेक्षा
नगर परिषद प्रशासनाने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाकडून एकदा अतिक्रमणांवर कारवाई झाल्यानंतर पुन्हा कित्येक महिने कारवाई होत नसल्याने पुन्हा अतिक्रमणे उभी राहत आहेत. त्यामुळे या कारवाईत सातत्य राहिले नाही तर तो केवळ दिखावाच ठरेल, असे मत शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -