घरठाणेसार्वजनिक स्वच्छतेबाबत दंडात्मक कारवाई करावी

सार्वजनिक स्वच्छतेबाबत दंडात्मक कारवाई करावी

Subscribe

सफाई कामगारांकडून सूचना

ठाणे । ठाणे शहर दिवसागणिक स्वच्छतेची मानके पूर्ण करते आहे. यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. पण अजूनही काही नागरिक बेशिस्त वागतात, अनेकदा महापालिका कर्मचारी सकाळी कचरा नेण्यासाठी घरी जातात तेव्हा दार उघडत नाहीत. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो, अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. आपले ठाणे शहर सर्वांगाने बदलत असून स्वच्छतेत देखील आपले शहर सर्वोच्च स्थानी राहिल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करीत आहोत. असा विश्वासही सफाई कर्मचार्‍यांनी आयुक्तांना दिला.

सफाई कर्मचारी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदार आहेत, मात्र त्याच वेळी ठाणे शहराचे नागरिक म्हणून शहराप्रती त्यांच्या काही अपेक्षा असू शकतात. त्यांची काही मते देखील असू शकतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाचे पाचवे सत्र गुरुवारी (1 फेब्रुवारी) ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांसमवेत पार पडले. यात शहराच्या विविध भागात काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा सहभाग होता. या पाचव्या चर्चासत्रात वैशाली जाधव, कांताबाई सोनकांबळे, शिवानी बिडवई, अश्विनी पवार, सीता राठोड, सारिका मेस्त्री, संगिता अडसुळे, कांचन चिखले, जितेश प्रकाश पोतदार, सत्यविजय कांबळी, दत्तात्रय वनमाळी, संजय बोंढारे, जितेश वागले, मनोज दाभोळकर, सागर पाटील आदी सफाई कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

सर्व्हिस रोडवरील गाड्या हटवा
शहरातील सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी जुन्या गाड्या कायमस्वरुपी उभ्या असतात, त्यामुळे या वाहनांखालचा कचरा काढणे शक्य होत नाही. बरेचदा वाहनांखाली काही मुके प्राणी मरुन पडलेले असतात, वाहनांखालील प्राणी तातडीने हलविणे शक्य नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या वाहनांबाबत योग्य तो निर्णय व्हावा व याबाबत जनजागृती करावी हा मुद्दा सफाई कर्मचार्‍यांनी पोटतिडकीने मांडला.

गर्दुल्ल्यांमुळे शौचालयांची दुरवस्था
शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतांची दुरावस्था गर्दुल्यांमुळे होत आहे, मद्यपी मद्यप्राशन करुन बाटल्या शौचालयात टाकतात, अनेकदा साफसफाई करताना बाटल्यांच्या काचा सफाई कर्मचार्‍यांना लागतात, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा अपेक्षा यावेळी सफाई कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

रस्ते चांगले हवेत
शहरात अनेक ठिकाणी विविध कामांसाठी केबल्स टाकण्यासाठी रस्ते खणले जातात, परंतु ते पुन्हा पूर्ववत केले जात नाही, त्यामुळे रस्त्यावरील खड्डयातून सफाई करताना त्रास होत असल्याचेही सफाई कर्मचार्‍यांनी नमूद केले. काँक्रिट तसेच डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरील कचरा हा व्यवस्थित निघत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप सुविधा
मुलांच्या शिक्षणासंदर्भात आयुक्तांनी प्रश्न विचारला असता, मुलांच्या शिक्षणाची फी परवडत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तर आर्थिकदृष्ठ्या शक्य होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावर महापालिका तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी महापालिकेने स्कॉलरशीप योजना सुरू केलेली आहे. स्कॉलरशीप अंतर्गत इयत्ता पहिली ते चौथी पर्यत प्राथमिक शिक्षणासाठी वार्षिक रुपये 4 हजार, पाचवी ते सातवी पर्यतच्या माध्यमिक शिक्षणासाठी वार्षिक रु. 6 हजार, आठवी ते दहावीपर्यंतच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी वार्षिक रु. 8 हजार, 11 वी ते 12 वी विद्यालयीन शिक्षणसाठी वार्षिक रु 9,600 तर 13 वी ते 15 वी पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक रु. 12 हजार इतके अनुदान देण्यात येणार असून याबाबतचा निर्णय नुकताच झाला आहे, याबाबतची सविस्तर आपल्यापर्यत पोहचविली जाईल असेही आयुक्तांनी नमूद केले. झोपडपट्टी विभागामध्ये असलेली घरे लहान असल्यामुळे मुलांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे विभागवार झोपडपट्टी विभागात अभ्यासिका उपलब्ध कराव्यात अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. यावर ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांना अभ्यासासाठी वर्ग उपलब्ध करुन दिले जातील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -