घरठाणेइराणी वस्ती आणि वडवली गावातील तरुणांमध्ये राडा

इराणी वस्ती आणि वडवली गावातील तरुणांमध्ये राडा

Subscribe

पोलिसच झाले फिर्यादी

इराणी वस्तीतील महिलेचा विनयभंग केल्याच्या गैरसमजुतीने कल्याण जवळील वडवली येथील तरुण आणि इराणी वसाहतीतील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करीत वातावरण शांत केले आहे. सायंकाळच्या सुमारास एक तीस वर्षीय महिला आपल्या पतीसह आंबिवली स्टेशन नजीक हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जात होती. रस्त्याच्या बाजूला उभा असणाऱ्या वडवलीतील दोन अनोळखी तरुणांनी त्यांना उद्देशून कुजबूज केली. यावेळी तक्रारदार महिलेच्या पतीने त्या दोन तरुणांना येथून निघून जा असे सांगितल्याने त्या गोष्टीचा तरुणांना राग येऊन तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत ते निघून गेले.

या संदर्भात नजमा हिने खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये या दोन अनोळखी तरुणांविरोधात दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. मात्र रात्रीच्या सुमारास दोन्हीकडील जमाव गोळा होत गेल्याने या ठिकाणी रस्त्यावरच हाणामारीस सुरुवात झाली. या हाणामारीत दोन्ही कडील जमावात सहभागी झालेले जखमी झाल्याची माहिती मिळून येत आहे. मात्र याबाबत वडवली आणि अटाळी येथील वास्तव्य करून राहत असणाऱ्या इराणी वस्तीतील समुदायाने खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी संदर्भात गुन्हा दाखल केला नाही. या हाणामारीने वळवली आणि अटाळीमधील जनजीवन विस्कळीत व चिंताजनक बनल्याने अखेरीस या हाणामारी बाबत खडकपाडा पोलिसांनी फिर्यादीची भूमिका स्वीकारीत दोन्हीकडे जमावांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच्या सुमारास पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याने होणारी संभाव्य तेढ निर्माण करणारी घटना वेळीच रोखता आली. त्यासाठी खडकपाडा पोलिसांचे येथे कौतुक होत आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करीत असून आंबिवली स्टेशन परिसरात आणि वडवली गावात तणावग्रस्त शांततापूर्व वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -