राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेत ठाणे जिल्ह्यातील सात प्रकल्पांची निवड

फेब्रुवारीत २९ व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेत निवड झालेल्या प्रकल्पांचे सादरीकरण

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेत ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सात प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. “शाश्वत जीवनातील विज्ञान” हा यंदाच्या परिषदेचा मुख्य विषय असून बालवैज्ञानिकांनी नावीन्य पूर्ण कल्पना, संशोधन, वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून काही संशोधन प्रकल्पांची निर्मिती केली आहे. २९ वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषद फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन माध्यमातून संपन्न होणार असून यात विद्यार्थी, निवड झालेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने, जिज्ञासा ट्रस्ट ठाणे संस्थेने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रकल्प सादरीकरण आयोजित केले होते. यात ३५५९ प्रकल्प जिल्हा पातळीवर सादर झाले असून त्यातील १०३ प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. महाराष्ट्रातून यातील ३० प्रकल्पांची निवड राष्ट्रीय परिषदेसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांपैकी ठाणे शहरातून सर्वाधिक ७ प्रकल्पांची निवड झालेली आहे.

ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या तन्मय महाजन आणि मानस भोसले या विद्यार्थ्यांनी दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेसाठी हवेच्या जॅकेटचे डिझाईन तयार केले आहे. यात वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अपघातावेळी दुचाकी स्वाराचे संरक्षण होऊ शकते. कोरोनाचा संसर्ग तसेच धूलिकणांपासून बचाव करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे कृत्रिम मास्क हे खर्चीक आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. तेव्हा सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मिहिका सावंत आणि आदिती चौधरी या विद्यार्थिनींनी धूलिकण आणि कोरोना वायरस सारख्या संसर्गाला आळा घालणाऱ्या कापडी पर्यावरणपूरक मास्कची निर्मिती केली आहे. विशिष्ट डिझाईनचा हा मास्क चार थरांचा असून वापरलेल्या सिल्क आणि कॉटनच्या साड्यांचा यासाठी वापर करण्यात आला आहे.

प्लास्टिक हा एक असा पदार्थ आहे की जो वर्षानुवर्षे तसाच राहून पर्यावरणाला हानी पोहोचवतो. तेव्हा ए के जोशी महाविद्यालयातील जय जोशी आणि रुचिर दामले या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटलचा पुनर्वापर करून कमी सामग्रीत सॅनिटायरझर आणि हँडवॉश डिस्पेन्सरची निर्मिती केली आहे. यामुळे डिस्पेन्सरचा उत्पादन खर्च कमी होऊन, उपलब्ध असलेल्या प्लास्टिक बॉटेलचा यासाठी पुनर्वापर करता येऊ शकतो. सरस्वती शाळेच्या देवांशी गायकवाड आणि सुभद्रा चव्हाण या विद्यार्थिनींनी इकोफ्रेंडली डायपरची निर्मिती केली आहे. यात घरगुती पद्धतीने केळीच्या खोडापासून बनवलेला कागद, कापूस, नैसर्गिक हायड्रोजन, जलरोधक कापड, सुती कापड इत्यादींचा वापर केला आहे.

अनेकदा धातू तसेच प्लास्टिकचे आवरण असणारे चष्मे वापरल्याने चेहऱ्यावर काळे डाग पडल्याचे पाहायला मिळते. तेव्हा ही समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबईच्या विद्याभवन हायस्कुलच्या इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या श्रुती कुलकर्णी आणि प्रिया कोपार्डे या विद्यार्थिनींनी कापडवेष्टीत चष्मे तयार केले आहेत.

कोरोना महामारीकाळात मास्कचे उत्पादन प्रचंड वाढले असून हे मास्क पर्यावरणपूरक नसल्यामुळे पृथ्वीवरील प्रदूषणात दिवसेंदिवस भर टाकत आहेत. तेव्हा भविष्यातील भीषण परिणामांची शृंखला तोडण्यासाठी ठाण्यातील ए के जोशी शाळेतील विद्यार्थि निलभ शेजवलकर आणि स्वराज चव्हाण यांनी मास्क ब्रिक हा प्रकल्प तयार केला आहे. यात २५० ग्रॅम सीमेंट, ३० ग्रॅम मास्क आणि पाणी इत्यादींचा वापर करून बांधकाम क्षेत्रातील विटेला पर्याय ठरू शकेल अशी ब्रिक तयार केली गेली आहे. तर सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील सुरवी लोखंडे आणि निधी मटवाणी या विद्यार्थिनींनी बायोडिग्रेडेबल गोळ्या पॅकिंगचा प्रकल्प तयार केला आहे. विविध विषय हाताळून त्यावर संशोधन केलेल्या बालवैज्ञानिकांचे सध्या सर्वस्थरातून कौतुक केले जात आहे.

दररोजचे जीवन जगत असताना आताच्या पिढीला ज्या समस्या दिसत आहेत, त्या समस्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांमधून केला आहे. कोरोनाकाळात शाळा ऑनलाईन माध्यमातून सुरू असताना देखील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प तयार केले आहेत,असे सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी बोलताना सांगितले.