घरठाणेधावत्या गाड्यांवर कोसळले झाड, दुचाकीस्वार जखमी

धावत्या गाड्यांवर कोसळले झाड, दुचाकीस्वार जखमी

Subscribe

धावत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनासह रस्त्यालगत उभ्या केलेल्या रिक्षावर झाड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी आठ वाजून १०मिनिटांच्या सुमारास वागळे इस्टेट रोड नंबर १६ येथे घडली. या घटनेत अनोळखी दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. कोसळले झाड हे गुलमोहराचे असून ते अंदाजे तीस वर्ष जुने आहे. या घटनेमुळे काही काळ त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

वागळे इस्टेट,रोड नंबर १६ या ठिकाणी द्वारका हॉटेल समोर असलेले गुलमोहराचे झाड रस्त्या शेजारी पार्क केलेल्या रिक्षा व श्रीनगर कडे जाणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकीवर पडले. या घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी महापालिका उप-आयुक्त शंकर पाटोळे यांच्यासह उद्यान निरीक्षक, उद्यान तपासणीस व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. घटनास्थळी  पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने कापून बाजूला केले. पडलेल्या झाडामुळे त्या परिसरातील काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. झाड कापून बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही. या कोसळलेल्या झाडाने तीन वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -