घरठाणेआसनगाव स्थानकाजवळ लोकलच्या चाकाला आग

आसनगाव स्थानकाजवळ लोकलच्या चाकाला आग

Subscribe

काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प

कसाऱ्याहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलचे ब्रेक जॅम होऊन अचानक धूर येऊ लागल्याने भयभीत झालेल्या चाकरमानी प्रवाशांनी जीव धोक्यात टाकून उड्या मारल्या. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाटल्यांमधील पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले तरी चाकरमानी प्रवाशांचा मात्र गोंधळ उडाला. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळील पुलाजवळ सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दुरुस्ती केल्यानंतर वीस मिनिटांनी विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली.

कसाऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकलचे पाठीमागून पाचव्या डब्याचे ब्रेक जॅम झाले.आसनगाव स्थानकाजवळ आज सकाळी ८:५५ च्या सुमारास ही घटना घडली. ब्रेक जॅम झाल्याने ब्रेक आणि चाकांमध्ये झालेल्या घर्षणामुळे चाकांना आग लागून धूर येऊ लागला. अचानक येऊ लागलेल्या धुरामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. भयभीत झालेल्या प्रवाशांनी आरडाओरड करून लोकल मधून अक्षरशः उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून मोटरमन ने लोकल थांबविली असल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. प्रवाशांनी सावधानता बाळगून बाटल्यांमधील पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. मोटरमन ने देखील ब्रेक जॅम झालेल्या डब्याकडे धाव घेऊन जॅम झालेल्या ब्रेकची तत्काळ दुरुस्ती केली. त्यानंतर लोकल आसनगाव स्थानकात आली. पंधरा ते वीस मिनिटानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाली असली तरी कामावर जायची घाई असणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची मात्र त्रेधा उडाली होती. या दरम्यान लोकलच्या मागे असलेल्या अप मार्गावरील पंचवटी एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस तसेच आसनगाव स्थानकातील ठाणे लोकलचा खोळंबा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -