Coronavirus: SC/ST रेल्वे युनियनपेक्षाही BCCI गरीब; कोहली, धोनी तर बोलायलाच नको

SC ST Railway Association and BCCI corona help

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत किक्रेट बोर्ड असल्याचे म्हटले जाते. बॅलन्सशीट चेक केल्यास ते खरंही असेल. मात्र कोरोना व्हायरसच्या मदतीच्या रकमेवरुन बीसीसीआय पेक्षा भारताचे SC / ST रेल्वे कामगार असोसिएशन अधिक श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे. दोन्ही संस्थानी केलेल्या मदतीच्या रकमेवरुन आता सोशल मीडियावर तुलना सुरु झाली असून शनिवारी दिवसभर ट्विटरवर #ShameonBCCI अशा हॅशटॅग ट्रेंड केल्यानंतर संध्याकाळी ९ वाजता बीसीसीआयने आपली मदत जाहीर केली.

थांबा.. मदत केली म्हणून तुम्ही बीसीसीआयचे अभिनंदन करणार असाल. जरूर करा. पण काही फॅक्ट्स तुमच्या नजरेखालून जाऊ द्या. ज्या SC/ST रेल्वे युनियनचा हवाला देऊन बीसीसीआयला ट्रोल केले गेले. त्या युनियनपेक्षाही कमी मदत त्यांनी केली आहे. २६ मार्च रोजी अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे युनियनने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ७० कोटींची मदत जाहीर केली होती. तेव्हापासून देशातील तथाकथित श्रीमंत संस्था, सेलिब्रिटींना नेटीझन्सनी ट्रोल करायला सुरुवात केली. आज बीसीसीआयने ५१ कोटींची मदत जाहीर केली असली तरी ती रेल्वे युनियनच्या तुलतनेत कमीच आहे.

 

 

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशभरातून विविध संस्था, सेलिब्रिटी, खेळाडू यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र कोरोनाने अनेकांची दानत यानिमित्ताने दाखवली आहे. सोशल मीडियातील नेटिझन्सने तर मदत न जाहीर करणाऱ्यांना तर अक्षरशः ठोकून काढले आहे.

विराट आणि धोनीही ट्रोल

अनेक देशी आणि परदेशी उत्पादनांचे ब्रँड अँबेसेडर असलेले विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना देखील ट्रोल करण्यात आले आहे. विराट कोहलीने तर अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. मात्र धोनीने केवळ एक लाखांची मदत दिल्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. तर भारतरत्न सचिन तेंडुलकरने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अनुक्रमे २५ लाखांची मदत दिली आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघातून बाहेर असलेला सुरेश रैना कौतुकास पात्र ठरला आहे. त्याने तब्बल ५२ लाखांची घसघशीत मदत जाहीर केली आहे. रैना प्रमाणेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचा तांदुळ दान केला आहे.

पैलवान बजरंग पुनिया, धावपटू हिमा दास ने आपला एक पगार कोरोना ग्रस्तांसाठी देऊ केला आहे.

खेळांडू सोबत सेलिब्रिटी टार्गेट

खेळांडूना सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर आज #सलमान_शाहरुख_आमिर_दान_करो असा हॅशटॅगही जोरात सुरु आहे. दक्षिणेत कमल हसन, प्रकाश राज, चिरंजीवी, रजनीकांत यांनी भरभरून मदत जाहीर केली असतानाही बॉलिवूडमधील खान मंडळी अजूनही शांत आहेत. एरवी सरकारी जाहीरातीमधून सर्वात पुढे येणारे हे स्टार कोणतीच मदत देत नसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांनी याआधी केलेल्या समाजकार्याची जंत्री सोशल मीडियावर द्यावी लागत आहे.