Video: समुद्रात पडलेला आयफोन व्हेल माशाने आणून दिला

whale return iphone
व्हेल माशाने समुद्रातून आणून दिला आयफोन

समुद्रात एकदा पडलेली वस्तू ही पुन्हा मिळत नाही, असे म्हणतात. त्यात जर तो मोबाईल असेल तर काही विचारायची सोय नाही. मात्र नॉर्वेच्या एका घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण समुद्रात पडलेला एक आयफोन चक्क व्हेल माशाने वर आणून दिला. बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चढ्ढा हीने सदल व्हिडिओ आपल्या ट्विटरवर रिट्विट केला आहे. रिचा चढ्ढा ही अभिनयासोबतच राजकारण आणि पर्यावरण या गोष्टींवर आपली स्पष्ट मते व्यक्त करताना आपण अनेकदा पाहिले आहेच. आताही तिने व्हेल माशाचा व्हिडिओ शेअर करुन नवीन माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत दिली आहे.

सायन्स गर्ल नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सदर व्हिडिओ शेअर झालेला आहे. नॉर्वेमधील हॅमरफेस्ट हार्बर येथे एका महिलेचा आयफोन चुकून पाण्यात पडला होता. त्यानंतर बेलुगा व्हेलने तो फोन पाण्यातून वर आणून दिला, असे कॅप्शन देखील या व्हिडिओसोबत लिहिण्यात आली आहे.

हॅमरफेस्ट येथे दोन विद्यार्थींनी फिरण्यासाठी आल्या होत्या. छोट्या नावेतून समुद्राचे फोटो घेत असताना चुकून आयफोन पाण्यात पडला. त्यानंतर खाली असलेल्या एका बेलुगा व्हेल माश्याने तो फोन तोंडात धरुन वर आणून दिला. यावेळी दुसऱ्या विद्यार्थीनीने आपल्या मोबाईलमधून हा प्रसंग चित्रीत केला. बेलुगा व्हेल ही रशियाची गुप्तहेर असल्याची देखील अपाह मध्यंतरी उडाली होती. रशियाने हेरगिरी करण्यासाठी व्हेल माशांना प्रशिक्षित केले असल्याचे सांगितले जात होते. या व्हेल्सना कॅमेरा, हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, अशीही अफवा उडाली होती.

रिचा चढ्ढा ही ट्विटरवर राजकारणावर देखील भाष्य करते. आजच तिने भाजपच्या विरोधात एक ट्विट केले आहे. भाजप आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुस्लिमांना धमकी देत असल्याचा आरोप तिने केला. एकाबाजुला धमकी देत असताना भाजपचे नेते मात्र काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगत आहेत. असा टोला देखील रिचा चढ्ढाने लगावला.