Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई अंबरनाथमध्ये रात्रीत निर्णय बदलला... राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेसच्या पाठीशी

अंबरनाथमध्ये रात्रीत निर्णय बदलला… राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेसच्या पाठीशी

आज सकाळी अचानक समोर येत प्रवीण खरात यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांच्या प्रचारात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे काल रात्री काय घडले? याबाबतची चर्चा अंबरनाथ मध्ये रंगली आहे.

Related Story

- Advertisement -

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एका रात्रीत निर्णय बदलत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण खरात यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांच्या निवडणूक प्रचारात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रवीण खरात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. एवढेच नाही तर कालपासूनच ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. आज सकाळी अचानक समोर येत प्रवीण खरात यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांच्या प्रचारात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे काल रात्री काय घडले? याबाबतची चर्चा अंबरनाथ मध्ये रंगली आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण खरात या दोघांनी अर्ज भरला होता. आघाडीतर्फे काँग्रेस उमेदवार रोहित साळवे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर देखील प्रवीण खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मात्र आज त्यांनी रोहित साळवे यांना जाहीर समर्थन करण्याची घोषणा केली आहे.

दोघांनाही एबी फॉर्म

- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) या आघाडीने काँग्रेसचे रोहित साळवे यांची उमेदवारी निश्चित केली होती. या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी केली होती. मात्र असे असताना रोहित साळवे यांना काँग्रेसचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण खरात यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. काल दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामुळे प्रवीण खरात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत ते निवडणूक कार्यालयात पोहोचलेच नाही. त्यांचा मोबाईल नंबर देखील नॉट रीचेबल होता. परिणामी खरात यांची उमेदवारी निश्चित झाली. या प्रकाराबद्दल काँग्रेस आणि पीआरपीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आघाडीविरोधात जाणीवपूर्वक खेळी?

आज मात्र नाट्यमयरित्या प्रवीण खरात यांनी काँग्रेस उमेदवार रोहित साळवे यांची गळाभेट घेऊन त्यांना जाहीर समर्थन दिले. आणि मी संपूर्ण ताकदीने साळवे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. खरात नेमक्या कोणत्या कारणामुळे गायब झाले होते व त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही? याबद्दल उलटसुलट चर्चा असून त्यांनी आघाडीत बिघाडी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याची चर्चा शहरात होत आहे.

- Advertisement -