घरमुंबईराम कदमांसाठी हॅट्ट्रिक सोपी नाही

राम कदमांसाठी हॅट्ट्रिक सोपी नाही

Subscribe

घाटकोपर पश्चिम मतदारसंघ

सर्वात मोठी दहीहंडी लावून मनसेच्या व्यासपीठावरून राजकारणात प्रवेश केलेल्या राम कदम यांचा मराठीबहुल असलेला घाटकोपर पश्चिम मतदारसंघ हा बालेकिल्ला समजला जातो. सलग दोन वेळा विजय मिळवल्यानंतर आता हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला राम कदम लागले आहेत. त्यांना रोखण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्याचवेळी अमराठी भाषिकांऐवजी मराठी भाषिक उमेदवार रिंगणात उतरवण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास राम कदम यांना चुरशीच्या लढतीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गतवर्षी दहीहंडीच्या व्यासपीठावर महिलांबाबत काढलेल्या अपशब्दामुळे राम कदम हे बॅकफुटवर गेले होते. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी असलेले वजन व मतदारसंघातील वर्चस्व या बळावर त्यांनी उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यात यश मिळवले. 2009 मध्ये असलेला राज ठाकरेंचा करिष्मा व मराठीबहुल लोकवस्ती यामुळे कदम यांनी भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव करत मनसेच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकीय व्यासपीठावर पाऊल टाकले. त्यानंतर राजकारणातील बदलती हवा पाहून त्यांनी मनसेला रामराम ठोकत 2014 च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

2014 मध्ये तब्बल 80 हजार 343 मतांनी त्यांनी विजय मिळवला. तोपर्यंत कदम यांनी स्वत:ला मानणारा असा मतदार तयार केला. दोन लाख 62 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात तब्बल दीड लाख मराठी मतदार आहेत. राम कदम यांच्याविरोधात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ व माजी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण छेडा यांनी प्रयत्न सुरू केले होते. अवधूत वाघ यांनी कदम यांच्याशी सरळसरळ वैर घेतले होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी मतदारसंघात केलेल्या पोस्टरबाजीतून हे वैर स्पष्टपणे जाणवत होते.

त्यात राम कदम यांनी उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळवले असले तरी त्यांचा पराभव करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी बाह्या सरसावल्या आहेत. 2009 मध्ये राज ठाकरेंचा करिष्मा या मतदारसंघात दिसल्याने चुक्कल यांनी मोर्चबांधणीला सुरुवात केली असल्याचे बोलले जात असले तरी 2009 मध्ये मनसेला मानणारा मतदार पुन्हा शिवसेनेकडे वळला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून मात्र या मराठीबहुल मतदारसंघातून दरवेळी अमराठी उमेदवार देण्यात येत असल्याचा फटका त्या पक्षाला तर बसतोच पण तो राम कदम यांच्या पथ्यावरच पडतो. 2009 मध्ये आघाडीने या मतदारसंघातून जेनेट डिसूजा यांना तर 2014 मध्ये रामगोपाळ यादव यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही अमराठी भाषिक उमेदवारांना फारसा प्रभाव पाडता आला नसल्याचे त्यांना मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

जेनेट डिसूजा यांना 30 हजार 360 तर रामगोपाळ यांना 10 हजार 71 मते मिळाली होती. यावेळी येथून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसमधून एनएसयूआयचे वैभव धनावडे व राष्ट्रवादीचे अमोल मातेलेदेखील हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याचवेळी नसीम खान यांच्या गोटातील एका अमराठी उमेदवाराला रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे जर या मतदारसंघातून अमराठी उमेदवार आघाडीकडून रिंगणात उतरवल्यास त्याचा सर्वाधिक फायदा राम कदम यांनाच होण्याची शक्यता आहे. याउलट मराठी भाषिक उमेदवार दिल्यास मनसेचे गणेश चुक्कल व आघाडीच्या उमेदवाराकडून राम कदम यांना आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -