घरक्रीडासलामीवीर म्हणून खेळायला आवडते!

सलामीवीर म्हणून खेळायला आवडते!

Subscribe

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्याने संधीचे सोने करत या सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद ११५ धावांची खेळी केली. रोहितने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना रोहितला फारसे यश मिळत नव्हते. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला कसोटीतही सलामीला खेळवण्याचा निर्णय घेतला. मला मधल्या फळीपेक्षा सलामीलाच खेळायला आवडते, असे पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित म्हणाला.

- Advertisement -

मला सलामीला खेळायला आवडते. फलंदाजीसाठी वाट पाहण्यापेक्षा, पॅड घालून थेट मैदानात उतरणे मी पसंत करतो. प्रतिस्पर्धी संघाचे कोणते गोलंदाज डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी करणार आहेत, हे तुम्हाला माहित असते. त्यामुळे तुम्हाला योजना आखणे सोपे जाते. सहाव्या क्रमांकावर खेळताना चेंडू रिव्हर्स-स्विंग होतो, क्षेत्ररक्षणाची रचना वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला बर्‍याच गोष्टींचा विचार करावा लागतो, असे रोहितने सांगितले.

रोहितने डावखुरा फिरकीपटू सेनूरन मुथुस्वामीच्या चेंडूवर षटकार लगावत आपले कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटपेक्षा काय वेगळे करावे लागते असे विचारले असता रोहित म्हणाला, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून वेगळ्या प्रकारे खेळावे लागते. नवीन चेंडू यशस्वीपणे खेळण्यासाठी तुम्हाला मानसिकतेत बदल करावा लागतो.

- Advertisement -

शतक झळकावल्याचा आनंद!

रोहित शर्माने भारतात खेळताना आतापर्यंत १५ कसोटी डावांमध्ये ८८४ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ९८.२२ च्या उत्कृष्ट सरासरीने केल्या आहेत. मात्र, त्याला परदेशात फारसे यश मिळालेले नाही. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना शतक झळकावल्याचा मला आनंद आहे, असे रोहित म्हणाला. मला कसोटीत सलामीवीर म्हणून खेळायचे होते आणि हे मी संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी दिली. या संधीसाठी मी त्यांचा आभारी आहे. मी विश्वास सार्थकी लावत शतक केल्याचा मला आनंद आहे, असे रोहितने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -