घरमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांचा अखेर 'वंचित'ला रामराम!

गोपीचंद पडळकरांचा अखेर ‘वंचित’ला रामराम!

Subscribe

सांगलीचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे. येत्या २ दिवसांत पुढच्या वाटचालीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या विषयावर अखेर पडदा पडला असून सांगलीतले धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन अघाडीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सांगलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. ‘राज्यभर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी चर्चा करूनच वंचित सोडण्याचा निर्णय’ घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘मी वंचितच्या पदाचा राजीनामा दिला असून आजपासून पक्षाचं काम थांबवलं आहे. उद्या आणि परवा आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल’, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.

म्हणून भाजपबद्दलचं मत बदललं!

लोकसभा निवडणुकीदरम्यान गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. मात्र, आता त्यांची पुन्हा भाजपमध्येच जायची तयारी असल्याचं समोर आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ‘भाजपने धनगर आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांच्याबद्दलचं आपलं मत बदललं’, असं ते म्हणाले आहेत. ‘अखेरचा लढा या आंदोलनादरम्यान आम्ही मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी धनगर आणि धनगड या महाराष्ट्रातल्या एकाच जातीची दोन नावं आहेत, असं मान्य करत तसं प्रतिज्ञापत्रही नंतर कोर्टात सादर केलं. त्यामुळे विद्यमान सरकारच्या भूमिकेविषयी धनगर समाज समाधानी आहे’, असं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – अनाकलनीय प्रकाश आंबेडकर!

लोकांचा भाजपसोबत जाण्यासाठी दबाव

दरम्यान, ‘पुढे राजकीय वाटचाल काय असावी, याविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, विद्यमान सरकारवर धनगर समाज समाधानी असल्यामुळे समाजातील लोकांना भाजपसोबत जाण्यासाठी दबाव आहे. येत्या २ दिवसांत चर्चा करून निर्णय जाहीर करेन’, असं पडळकर यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांशी चांगले संबंध

वंचितला रामराम ठोकला असला, तरी त्यांचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ‘प्रकाश आंबेडकर हे एक चारित्र्यशील नेतृत्व आहे. फक्त कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सांगण्यानुसार वंचित सोडण्याचा निर्णय घेतला’ असं पडळकर यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -