अधिक मंत्री, महत्वाच्या खात्यांकडे लक्ष बिहार सत्तेचा नवा भाजप फंडा

भाजप

बिहारमध्ये सत्तेत सर्वाधिक जागा पटकावलेल्या भाजपला आता चांगल्या खात्यांसह अधिक मंत्रिपदांची अपेक्षा लागली आहे. सत्ता स्थापनेसाठी एनडीएच्या नवनिर्वाचित आमदारांची एकत्रित बैठक आज बोलवण्यात आली असून, या बैठकीत नेता निवडीचे सोपस्कार उरकले जाण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला सर्वाधिक मंत्री आणि महत्त्वाची खाती मिळावीत, असे प्रयत्न आतापासूनच भाजपने सुरू केले आहेत. यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना दिल्लीत बोलवण्यात आले आहे.

बिहार विधानसभेत विधिमंडळ पक्ष नेता ठरवण्यासाठी ची जबाबदारी पक्ष नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. सिंह हे आज होत असलेल्या विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नितीश कुमार यांच्याकडे देण्यास भाजप राजी आहे. पण संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये सर्वाधिक मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती मिळावीत, असे प्रयत्न सुरू आहेत. जनता दल(यू)ला निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर नितीश काहीसे मागे पडले आहेत. ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास त्याचा फटका देशभर बसेल, असे पक्ष नेत्यांना वाटते आहे. यामुळे प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार झाला आहे.

मात्र, संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये जास्त जागा भाजपाला हव्या आहेत. याशिवाय, महत्वपूर्ण खात्यांवर देखील भाजपाचा यंदा दावा असणार आहे. यातील बरीचशी खाती ही जनता दल(यू)कडे होती. पक्षाकडे कोणती खाती असावीत, याची माहिती आणि मंत्री ठरवण्यासाठी सुशील मोदींना दिल्लीत बोलवण्यात आले आहे.
बिहार निवडणुकीत ७४ जागा जिंकून भाजपने एनडीएतील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार यांना संधी दिली जाणार असली तरी दोन उपमुख्यमंत्री बनवून सत्तेवर अधिकतर लक्ष ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे. सुशील मोदी यांच्याशिवाय संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या कामेश्वर चौपाल यांनाही उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.