शिखर बँक घोटाळा प्रकरण अजित पवारांसह ६९ जणांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट

अजित पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चिट मिळाली आहे.

२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली होती. अशा एकूण ३०० च्यावर मंत्री आणि अधिकार्‍यांची नावे यात आहेत.