उघडले देवाचे दार ! राज्यात प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी

कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली राज्यातील प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारने नियमावलीही तयार केली असून, या नियमावलीचे प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थेला काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे सुरू करणे हा सरकारी आदेशच नाही तर ती ‘श्रीं’ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश काढताना म्हटले आहे.

प्रर्थनास्थळांतील गर्दीने संसर्ग वाढू नये, यासाठी नियम आणि शिस्तीचे पालन करण्याच्या निमित्ताने मंदिरात गर्दी होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी, असे सूचवले आहे. गर्दी टाळल्याशिवाय स्वत:बरोबर इतरांचेही संरक्षण होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रर्थनास्थळात चपला काढून प्रवेश केला जातो. पण आता मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश देऊ नये, असेही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिवाळीचे मंगल पर्व सुरू करताना प्रार्थनास्थळे सुरू होत असल्याचे सांगत प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या महामारीत राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केले. यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांमध्ये शिस्त पाळत त्या स्वत:च रोखल्या. यासाठी आवश्यक शिस्त पाळली. सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढर्‍या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकार घेत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला मिळतील, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.