पुढल्या वर्षी GDP मध्ये घसरण होणार; कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

RBI governor Shaktikant das
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज RBI चे द्वैमासिक मतधोरण जाहीर केले. दिलासादायक बाब म्हणजे यावेळी देखील बँकेने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो रेट ४.२ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. RBI च्या पतधोरण निर्धारण समितीची तीन दिवसांची बैठक आज संपली. त्यानंतर शक्तिकांत दास यांनी लाईव्ह संवाद साधत भारतीय अर्थव्यवस्थेबाबत काही अंदाज वर्तविले. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढाई लढत असताना भारतीय अर्थव्यवस्था महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, “कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा परिणाम हळुहळु कमी व्हायला लागला आहे. या महामारीसोबतची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या तिमाहीपेक्षा यावेळी कमी घसरण दिसत असून वर्तमान स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. यापुढे आपल्याला निर्बंध लावण्याऐवजी अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असे निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे.”

यासोबतच मॉनेटरी पॉलिसी कमिटीने ऑगस्टमध्ये जो रेपो रेट सांगितला होता. त्यात कोणताही बदल केला नाही. फेब्रुवारी २०१९ पासून आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने जवळपास अडीच टक्क्यांची कपात रेपो रेटमध्ये केली आहे.