खासदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ; सुप्रिया सुळे तिसऱ्या स्थानी

लोकसभेतील १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे एडीआर संस्थेच्या पाहणीतून समोर आले आहे. या यादीत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या, पिनाकी मिश्रा दुसऱ्या तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या स्थानी आहेत.

New Delhi
supriya sule wealth
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

संसदेतील १५३ खासदारांची संपत्ती तब्बल १४२ टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती समोर येत आहे. हे १५३ खासदार २०१४ साली पुन्हा निवडून आले होते. सर्व खासदारांच्या संपत्तीची सरासरी काढल्यास प्रत्येकी १३ कोटी ३२ लाखांची संपत्ती येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात वरच्या स्थानी भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, बिजू जनता दलाच्या खासदार पिनाकी मिश्रा तर तिसऱ्या स्थानी महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक लागत आहे. इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे.

इलेक्शन वॉच आणि एडीआर संस्थेच्या पाहणीनुसार वर्ष २००९ ते २०१४ मध्ये या १५३ खासदारांच्या सरासरी संपत्तीमध्ये ७.८१ कोटींची वाढ झाली होती. २०१४ साली या खासदारांनी जी आर्थिक माहिती दिली होती, त्यावरून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या संस्थाच्या पाहणीनुसार २००९ मध्ये या सर्व खासदारांची सरासरी संपत्ती ५.५० कोटी इतकी होती. जी आता १३.३२ कोटी म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे. सर्व खासदारांपैकी शत्रुघ्न सिन्हा हे सर्वात वरच्या स्थानी आहेत. २००९ साली त्यांची संपत्ती १५ कोटी इतकी होती. मात्र २०१४ साली ती १३१ कोटी इतकी सांगण्यात आली होती. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक ११६.७३ कोटींची वाढ नोंदवली गेली आहे. बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी सुद्धा १०७ कोटींची वाढ दाखवत २०१४ साली १३७ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. २००९ साली त्यांनी ५१ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले होते, तर २०१४ साली त्यांची संपत्ती ११३ कोटींची झाली असल्याचे एडीआरच्या माहितीतून समोर आले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी २००९ साली २ कोटी तर २०१४ साली ७ कोटी संपत्ती असल्याचे सांगितले आहे.

सर्वपक्षीय खासदारांचा आढावा घेतला असता लक्षात येते की, भाजपच्या ७२ खासदारांनी त्यांच्या संपत्तीत सरासरी ७.५४ कोटींची वाढ दाखवली आहे. काँग्रेसच्या २८ खासदारांनी सरासरी ६.३५ कोटींची वाढ दाखवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here