अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख बळी जाऊ शकतात, ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा अंदाज!

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेता एकीकडे अमेरिकेने लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला असताना आता तिथल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी अमेरिकेत १ ते २ लाख मृत्यू कोरोनामुळ होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.

New York
donald trump
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अवघं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत परिस्थिती अधिक गंभीर आहे. उच्च दर्जाची आरोग्यव्यवस्था आणि उपचार पद्धती उपलब्ध असून देखील अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, शेकडो रुग्णांना आत्तापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता अमेरिका कोरोनाचं नवं केंद्र ठरतंय की काय? अशी शंका व्यक्त केली जात असतानाच आता कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच नेमलेल्या वरीष्ठ शास्त्रज्ञांच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षांनीच अमेरिकेबाबत भीषण आणि धक्कादायक असा दावा केला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनामुळे भितीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आहे.

देशात लाखो लोकांना कोरोनाची बाधा होणार?

अमेरिकेच कोरोनाचा फैलाव वाढू लागलेला असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉ. अॅंथनी फाऊशी यांच्यासारख्या
काही ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविरोधात लढा देण्यासाठीचं संशोधन करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली. आणि त्याच डॉ. अँथनी फाऊशी यांनीच हा अंदाज वर्तवल्यामुळे त्याला नक्कीच काहीतरी आधार असल्याचं मानलं
जात आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. डॉ. फाऊशी म्हणाले, ‘अमेरिकेत कोरोनामुळे लाखो मृत्यू होऊ शकतात, याचा अंदाज वर्तवणारं मॉडेल आम्ही विचारात घेतलं होतं. आणि ते कठीण असलं, तरी अगदी अशक्य नक्कीच नाही. त्यामुळे अमेरिकेत सुमारे १ ते २ लाख मृत्यू आणि लाखो कोरोनाबाधित येत्या काळात सापडू शकतात.’

भारतातील लॉकडाऊन देखील वाढणार?

दरम्यान, अमेरिकेत वेगाने कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांवरून आता ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. भारतात देखील सध्याची परिस्थिती पाहाता १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन पुढे वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.


Corona Live Update : जगभरात कोरोनाचं थैमान, अमेरिकेने ३० एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन!