घरदेश-विदेशकाँग्रेसला ५५ वर्षांत जमले नाही, ते भाजपने ५५ महिन्यांत केले!

काँग्रेसला ५५ वर्षांत जमले नाही, ते भाजपने ५५ महिन्यांत केले!

Subscribe

पंतप्रधान मोदींचा लोकसभेतील शेवटच्या भाषणात हल्लाबोल

महागठबंधन हे महाठकबंधन असून ही महाभेसळ जनता नाकारणार असल्याचे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसचे अक्षरश: वाभाडे काढले. काँग्रेसने ५५ वर्षांत केलेली कामे आणि आमच्या सरकारने गेल्या ५५ महिन्यांत केलेल्या कामांची तुलना केल्यास चक्रावून जाल. काँग्रेसला साडेपाच दशके जनतेची जी कामे करता आली नाहीत, ती भाजपने अवघ्या साडेचार वर्षांत केली, असा दावाही पंतप्रधानांनी केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आमचे एनडीएचे सरकार प्रामाणिक, विकास आणि गरिबांचे सरकार म्हणून ओळखले जाते. सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली आहे. आम्ही देशातील जनतेला बांधिल आहोत. आगामी लोकसभेत देशातील तरुण प्रामाणिक सरकारला मत देतील. नवीन पिढी या देशाला आकार देईल. देशासमोर असलेली आव्हाने आम्ही पार करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विश्वास आणि आशावाद या देशाला पुढे नेईल. आव्हानांना घाबरून पळून जाणार्‍यांपैकी आम्ही नाही. आम्ही आव्हानांचा सामना करतो आणि देशाच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटतो. आमचे मित्र काँग्रेसला फक्त दोनच कालखंड माहीत आहेत. एक बीसी म्हणजे बिफोर काँग्रेस (काँग्रेसपूर्वी) जेव्हा काहीच झाले नाही. एडी म्हणजे आफ्टर डायनेस्टी (राजवंशानंतर) जेव्हा सर्व काही झाले. गेल्या चार वर्षांत देशात लक्षणीय प्रगती झाली आहे

गुंतवणूक, स्टील, स्टार्ट अप, दूध, शेती, नागरी उड्डाणमधील भारताची प्रगती उल्लेखनीय आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदींना विरोध करताना विरोधक देशाचा विरोध करू लागले. त्यामुळे त्यांचे नेते लंडनला गेले आणि तेथे पत्रकार परिषद घेऊन भारताची प्रतिमा मलिन केली. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत, काँग्रेसने निवडून आलेली ५० सरकारे पाडली. गेल्या चार वर्षांत दहाव्या, अकराव्या क्रमांकावरून भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

- Advertisement -

जेव्हा आपण जगातील अकराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो तेव्हा सध्या विरोधात असलेल्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती आणि आता सहाव्या क्रमांकावर आलो तर त्यांना दु:ख होत आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी हाणला.तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्यादृष्टीने माझा गुन्हा काय? एका गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांच्या सलतनतला आव्हान देतोय हाच माझा गुन्हा आहे. काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली, पण मोदी देशातील संस्था उद्ध्वस्त करताहेत. काँग्रेसने देशाच्या लष्कराचा अवमान केला. लष्कर प्रमुखांना गुंड म्हटले, पण मोदी देश उद्ध्वस्त करताहेत. देशातील लष्कर बंड करतंय, अशी स्टोरी काँग्रेस नेत्यांनी रचली. पण काँग्रेसने ३५६ कलमाचा गैरवापर केला.आम्ही देशातही खरे बोलतो आणि देशाबाहेरही. संसदेतही खरे बोलते आणि संसदेबाहेरही, पण खरे ऐकण्याची काँग्रेसची क्षमताच संपली आहे, अशी टीका मोदींनी केली.

एकमेकांचे शत्रू माझ्याविरोधात एकत्र येत आहेत. महागठबंधन हे महाठकबंधन असून ती महाभेसळ आहे. मात्र संपूर्ण बहुमत मिळालेले सरकार काय करू शकते हे देशातील जनतेने पाहिले आहे. त्यांनी एनडीएचे काम पाहिले आहे. त्यांना, कोलकातात एकत्र आलेले महाभेसळ सरकार नको आहे. काँग्रेसमधील आमच्या काही मित्रांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग केले आहे. त्यांनी लुटेर्‍यांना देश लुटू दिला. पण देशाबाहेर पळून गेलेले आता रडत आहेत. नऊ हजार कोटी घेऊन गेलो असताना मोदी १३ हजार कोटी घेत आहेत. त्यामुळे पळपुटे आता घाबरले असून लपून बसले आहेत, असे मोदी यांनी ठणकावून सांगितले.

काँग्रेसने देशातील लष्कराला कमकुवत केले. देशातील सैन्याला त्यांनी योग्य शस्त्रास्त्रे पुरवली नाही आणि आता सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत. त्यांनी सैनिकांना बुलेटप्रुफ जॅकेटही दिली नाहीत. मी ठामपणे सांगतो की, काँग्रेसला आपले लष्कर, आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा, देशाची वायूसेना सशक्त असावी, असे काँग्रेसला वाटत नाही. मी येथे अतिशय गंभीर आरोप करतोय. तुम्हाला राफेल करार रद्द करायचा आहे, कोणासाठी? कोणत्या कंपनीसाठी, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला.

*महाआघाडी म्हणजे महाभेसळ गठबंधन
*एका गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांच्या
*सलतनतला आव्हान देतोय हाच माझा गुन्हा आहे.
*काँग्रेसला राफेल करार रद्द करायचा आहे,
*कोणासाठी? कोणत्या कंपनीसाठी?
*वायूसेनेला राफेल मिळू नये म्हणून प्रयत्न
*सर्जिकल स्ट्राईकची काँग्रेसमध्ये क्षमता नाही
*काँग्रेसमुक्त भारत हे माझे स्लोगन नाही. ते ममता बॅनर्जी यांचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -