पुनर्विचार याचिका करणार नाही – सुन्नी वक्फ बोर्डाचा निर्णय

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

New Delhi
ayodhya case supreme court

एकीकडे अयोध्या निकालाचं देशभरात सर्वच स्तरातून स्वागत केलं जात असतानाच या प्रकरणातील प्रतिवादी असलेले सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सुन्नी वक्फ बोर्डाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका टाकण्याचा कोणताही विचार नसल्याचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालावर आता अंतिम शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देशातल्या कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. मात्र, देशातल्या इतर न्यायालयांप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांवर सर्वोच्च न्यायालयातच पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली जाऊ शकते. त्याच आधारे अयोध्या निकालावर देखील फेरविचार याचिका अर्थात रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

तब्बल ३७ दिवस चाललेल्या सुनावणीनंतर १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज सकाळीच न्यायालयाने या प्रलंबित प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार, अयोध्येतली वादग्रस्त जमीन रामलल्ला अर्थात भगवान राम यांच्याच मालकीची असल्याचं न्यायालयानं मान्य केलं. राम मंदिराच्या उभारणीसाठी येत्या ३ ते ४ महिन्यांमध्ये ट्रस्टची स्थापना करून ही जमीन ट्रस्टला हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने यावेळी दिले. तसेच, प्रकरणातील मुस्लीम पक्षकारांना अर्थात सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येमध्येच ५ एकर जमीन देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

दरम्यान, या निकालानंतर मुस्लीम पक्षकारांकडून पुनर्विचार याचिका दाखल केली जाण्याची शक्यता होती. मात्र, उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे संचालक झफर फारूकी यांनी पुनर्विचार याचिकेचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही कोणत्याही स्वरूपात फेरविचार याचिका करण्याचा विचार करत नाही’, असं ते यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Ayodhya Verdict : जागा रामलल्लाचीच, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मुद्दे!