‘Amazon’चे जंगल पेटले; जगाच्या फुफ्फुसांची होतेय राख!

पृथ्वीची फुफ्फुसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Amazon च्या जंगलाला गेल्या महिन्याभरापासून प्रचंड आग लागली आहे. आत्तापर्यंत १७ टक्के जंगल जळून खाक झालं आहे.

Amazon rainforest fires
२४ ऑगस्टला टिपलेलं अॅमेझॉन जंगलातल्या आगीचं दृश्य

एकीकडे भारतात आणि महाराष्ट्रात राजकीय चर्चा आणि निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागलेला असताना तिकडे ब्राझीलमध्ये Amazon च्या जंगलानं पेट घेतला आहे. या घटनेमुळे आख्खं जग चिंतित झालं आहे. आणि याचं कारण म्हणजे याच Amazon च्या जंगलांमधून संपूर्ण पृथ्वीला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा होतो. आणि गेल्या जवळपास महिन्याभरापासून भडकलेल्या आगीमध्ये आत्तापर्यंत १५ ते १७ टक्के जंगल जळून खाक झालेलं आहे. हा आकडा प्रचंड असून वेळीच जर ही आग आटोक्यात आली नाही, तर संपूर्ण Amazon चं जंगल जळू शकतं. आणि त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगमध्ये प्रचंड वाढ होण्यात होऊ शकतो. पण खेदाची बाब म्हणजे तिथल्या सरकारला याचं तितकं गांभीर्य नसल्याचं त्यांचे पंतप्रधान जेर बोल्सेनारो यांच्या वर्तनावरून दिसत आहे.

महिन्याभरापासून पेटलंय जंगल

दक्षिण अमेरिकेतल्या बाझीलचा बहुतांश भाग, कोलंबिया, पेरू आणि इतर देशांच्या प्रदेशात पसरलेलं Amazon चं जंगल म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसंच आहेत. आरेचं जंगल जशी मुंबईची फुफ्फुसं आहेत, तसंच हे आहे. जवळपास ३० ते ३५ दिवसांपूर्वी या जंगलात आग लागली. ब्राझीलकडच्या भागामध्ये ही आग पेटली असून अजूनही विझायचं नाव घेत नाहीये. मात्र, महिन्याभरापासून Amazon पेटत असताना ब्राझीलकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकादी जगभरातल्या देशांनी ब्राझीलच्या धोरणावर चिंता आणि नाराजी व्यक्त केली. तसेच, ब्राझील सरकारने Amazon मध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. जी-७ मधल्या देशांनी देखील ब्राझीलमधल्या Amazonच्या आगीवर चिंता व्यक्त केली.

ब्राझीलचं ४४ हजार सैन्य Amazon च्या काठावर

अखेर आंतरराष्ट्रीय दबावामुळे खडबडून जागे झालेल्या ब्राझील सरकारने पावलं उचलली. नुकतेच त्यांचे पंतप्रधान जेर बोल्सेनारो यांनी ४४ हजार ब्राझील सैन्य या कामी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सैनिकी कामाचा अनुभव असणाऱ्या या सैनिकांना जंगलात भडकलेली आग कशी विझवायची? सुरुवात कुठून करायची? आणि त्याचं स्वरूप किती गंभीर आहे? याची पुरेशी कल्पना नसल्यामुळे यातलं बहुतांश सैन्य ब्राझीलच्या पोर्टो वेल्हो या भागामध्ये थांबलं आहे. आग विझवण्याच्या कामी दुय्यम भूमिका निभावणं इतकंच हे सैन्य करू शकलेलं आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत

Amazon च्या पेटलेल्या जंगलांवरून सध्या ब्राझीलची लष्करी विमानं लाखो लिटर पाणी या जंगलांवरून फवारत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न देखील पुरेसे ठरत नाहीत. या प्रयत्नांतून अत्यंत संथ गतीने ही आग विझत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी आग विझवण्याच्या कामी तांत्रिक आणि आर्थिक मदत ब्राझीलला करण्याचं मान्य केलं आहे. याशिवाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील पाणी फवारणीसाठीची विमानं आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्याचा दिलेला प्रस्ताव जेर बोल्सेनारो यांनी मान्य केला आहे. यासंदर्भात बोलताना कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इवान डक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘Amazon चं जंगल ज्या देशांमध्ये पसरलेलं आहे, त्या देशांदरम्यान या जंगलाच्या संवर्धनासाठी करार असायला हवा. Amazon चं संरक्षण हे आपलं नैतिक कर्तव्य आहे’, असं डक म्हणाले आहेत. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये पेटलेलं अॅमेझॉन लवकरात लवकर शांत व्हावं, अशीच प्रार्थना जगभरातून लोक करत आहेत. कारण Amazon नष्ट झालं, तर फक्त ब्राझील आणि इतर दक्षिण अमेरिकी देशांचंच नाही, तर संपूर्ण जगाचं मोठं नुकसान होणार आहे.

Amazon इतकं महत्त्वाचं का आहे?

  • जगभरातल्या एकूण ऑक्सिजनपैकी तब्बल २० टक्के ऑक्सिजन एकट्या Amazonमधून मिळतो
  • ५०० आदिवासी जमातींची १० लाख लोकसंख्या तिथे वास्तव्य करते
  • सुमारे ३० लाख प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींचं ते घर आहे
  • ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यात Amazon च्या जंगलांची महत्त्वाची भूमिका असते