अमानवी! बापाचा बलात्कार, आईची जबरदस्ती; मुलीनं टेकले हात!

पोटच्या मुलींवरच बलात्कार करणाऱ्या नराधम बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lucknow
Delhi radio jockey harassed by security guards and rwa president in delhi

‘माता नव्हे तू वैरीण’, हे देखील कमी पडावं अशी धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना लखनौमध्ये घडली आहे. आपल्याच मुलीवर तिच्या वयाच्या ६व्या वर्षापासून बलात्कार करणारा बाप, आपल्याच मुलीला तिच्याच वडिलांशी संबंध ठेवायला भाग पाडणारी आई आणि एवढ्यावरून भागलं नाही, म्हणून पुन्हा तिच्या धाकट्या बहिणीवरदेखील बलात्कार करणारा नराधम पिता…हे सगळं ऐकून प्रत्यक्ष पोलीस देखील सुन्न झाले. या प्रकरणी इतक्या वर्षांपासून हा छळ सोसणाऱ्या २२ वर्षीय मोठ्या बहिणीने अखेर धाकट्या बहिणीला वाचवण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. नराधम फरार बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला साथ देणाऱ्या आईला अटक करण्यात आली आहे. पण हा प्रकार उघड झाल्यापासून आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे.

६ वर्षांची असल्यापासून बलात्कार

हा प्रकार घडला लखनौ शहराच्या जवळच असलेल्या चिन्हाटमध्ये. चिन्हाटच्या पोलीस स्टेशनमध्ये एका २२ वर्षीय तरूणी तिच्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार करण्यासाठी आली होती. जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली, तेव्हा खरा आणि भीषण प्रकार समोर आला. जी तरुणी तक्रा करण्यासाठी आली होती, तिच्यावर तिचाच पिता गेल्या १६ वर्षांपासून म्हणजेच ती ६ वर्षांची असल्यापासून बलात्कार करत होता. इतकंच नाही, तर तिचीच आई तिला हे सगळं करण्यासाठी भाग पाडत होती. वर गर्भधारणा टाळण्यासाठी तिला गर्भनिरोधक देखील देत होती. काही वर्षांनी या नराधम पित्याने त्याची विकृत नजर आपल्याच लहान मुलीकडे वळवली. तिच्यावर देखील त्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकाराबद्दल या मुलींचे दोन भाऊ, त्यांच्या घरातले भाडेकरू आणि त्यांच्या काही नातेवाईकांना देखील माहिती होतं. मात्र, कुणीही यावर चकार शब्द देखील काढला नाही.


हेही वाचा – पंढरपुर : दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

…अखेर मुलीने धीर केला!

वडिलांचे अत्याचार नशीब समजून सहन करणाऱ्या मोठ्या बहिणीने जेव्हा आपल्या धाकट्या बहिणीसोबत देखील हाच प्रकार घडत असल्याचं पाहिलं, तेव्हा मात्र तिने धीर करून एका एनजीओची वाट धरली. एनजीओच्या संचालिका अर्चना सिंह यांच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबत अर्चना सिंह यांनी सांगितलं, ‘तिच्या आईला पहिल्यापासून हे सगळं माहिती होतं. पण ती तिला गर्भनिरोधक द्यायची. या मुलीने हेच आपलं नशीब म्हणून मान्य करून घेतलं होतं. पण जेव्हा तिच्या धाकट्या बहिणीसोबत देखील हेच व्हायला लागलं, तेव्हा मात्र तिने विरोध केला.’ या प्रकरणात नराधम पित्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोक्सो कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीच्या आईविरोधात देखील गुन्ह्यात मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.