शहीद मेजर नायर अनंतात विलीन

नौशेरा येथे दहशतवाद्यांनी जवानांच्या टीमवर आयईडीचा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर शशीधरन व्ही नायर यांना हौताम्य प्राप्त झाले असून त्यांच्यावर खडकवासला येथील राहत्या घरी वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jammu-Kashmir
Funeral today on Shaheed Major Nair
शहीद मेजर शशीधरन व्ही नायर

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. शुक्रवारी रात्री नौशेरा येथे दहशतवाद्यांनी जवानांच्या टीमवर आयईडीचा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर शशीधरन व्ही नायर यांना हौताम्य प्राप्त झाले. शनिवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी खडकवासला येथील राहत्या घरी वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे घोरपडी येथील राष्ट्रीय युद्ध समारकामध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल एन. एस. लांबा यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यानंतर लष्करी अधिकारी, सैनिक, नायर कुटुंबांनी त्यांना आदरांजली वाहिली.

मेजर नायर यांच्याविषयी…

मेजर शशीधर नायर हे पुण्याचे रहिवासी असून ते मुळचे केरळचे आहेत. दरम्यान, ते पुण्यातल्या खडकवासला येथे त्यांचे कुटुंबिय राहतात. मेजर नायर यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे ३० वर्षांहून अधिक काळ नायर कुटुंबीय खडकवासला परिसरात स्थायिक होते. डीआयएटी आणि एनडीएमधील केंद्रीय विद्यालयात नायर यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. या काळात ते राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र होते. त्यातून लष्करात दाखल होण्याची त्यांची ओढ आणखी वाढली. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर डिसेंबर २००७ मध्ये ते लष्करात दाखल झाले. लष्कराच्या फर्स्ट गुरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते. अकरा वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत त्यांनी दहशतवादग्रस्त भागासह ताबारेषेवरही सेवा बजावली. मेजर शशीधरन व्ही नायर घरी यायचे तेव्हा ते सर्वांशी आपुलकीने संवाद साधत. त्याचप्रमाणे लहान मुलांशी ते आवर्जुन संवाद साधत त्यांना लष्करात दाखल होण्यासाठी प्रेरणा देखील देत. तसेच लष्करी बाण्यामुळे त्यांना शिस्तीची प्रचंड आवड होती. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here