हे काय भलतंच? तिला बोईंग विमानाशी लग्न करायचंय!

जर्मनीतली एक ३० वर्षांची महिला बोईंग विमानाच्या प्रेमात पडली आहे. आणि या महिलेला त्या बोईंग विमानाशी लग्न देखील करायचं आहे.

Mumbai
Michele Kobke wants to marry with boing jet plane

‘प्रेम करावं भिल्लासारख, बाणावरती खोचलेलं’… प्रेमाला अनेक उपमा आजवर होऊन गेलेल्या अनेक महान कवींनी दिल्या आहेत. या उपमांमध्ये अनेकदा निर्जीव वस्तूंची देखील प्रेमाशी तुलना केली गेली आहे. पण वास्तवात असं काही खरंच घडेल, याची कदाचित या कोणत्याही कवीला कल्पना नसावी. पण तसं घडलंय. होय, जर्मनीमधली एक महिला ‘बोईंग ७३७-८००’ या जेट विमानाच्या प्रेमात पडली आहे! त्याहून धक्कादायक बाब म्हणजे तिला या विमानासोबत डेटिंग करायचंय! त्याहून जास्त धक्कादायक बाब म्हणजे तिला या विमानासोबत लग्न करायचं! आणि सर्वात विशेष बाब म्हणजे ती अजिबात वेडी नसून नॉर्मल आहे!

मिशेल बोईंगच्या आकंठ प्रेमात!

हे सगळं घडलंय जर्मनीच्या मिशेल कोबके हिच्यासोबत. २०१४मध्ये मिशेलने बर्लिनमध्ये विमानतळाच्या काचांमधून बोईंग ७३७-८०० हे विमान पाहिलं आणि मिशेलचा स्वत:वरचा ताबा सुटला! विमानाची पाती, पंख यांच्या ती भंयकर प्रेमातच पडली. लव्ह अॅट फर्स्ट साईटच म्हणा ना! ३० वर्षांची मिशेल तेव्हापासून या बोईंगसोबत ‘डेट’ करण्याची स्वप्न रंगवतेय. एवढंच काय, गेल्या महिन्यात मिशेलला आपल्या या प्रियकराला भेटण्याची संधी मिळाली. ती मोठ्या प्रेमात त्याच्या पंखांवर चढली आणि तिने थेट त्याचं चुंबन घेतलं! येत्या मार्च महिन्यात नेदरलँडमध्ये त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा आहे.

ती रोज बोईंगच्या कुशीत झोपते!

मिशेल म्हणते, ‘मला असं कुणीतरी हवं आहे, जे आमच्या दोघांचं लग्न लावून देईल. मग आम्ही दोघं एकमेकांचं चुंबन घेऊ..आम्हाला एकत्रच पुरलं जावं. त्यानंतर आम्ही कायमचे एकत्र राहू’! लग्नात कोणते कपडे घालायचे, हे देखील मिशेलने ठरवून टाकलं आहे. ती म्हणते, ‘मला लग्नात इतर स्त्रियांसारखा पांढरा गाऊन घालायचा नाहीये. मला करकरीत
इस्त्री केलेली काळी पँट आणि काळा कोट आमच्या लग्नात घालायचा आहे’. आपला लाडका प्रियकर ‘शेट्झ’ अर्थात या बोईंगला मिशेल फारच मिस करते. इतकं, की रात्री झोपताना ती या बोईंगची एक प्रतिकृती कुशीत घेऊन झोपते.

‘आमचं नातं सामान्यच’

तज्ज्ञांच्या मते, मिशेलला तिच्या शेट्झबद्दल वाटणारं प्रेमयुक्त आकर्षण विचित्र असलं, तरी हे काही नवीन नाही. हे ऑब्जेक्टोफिलियाचं एक उदाहरण आहे. या प्रकारात निर्जीव गोष्टीकडे प्रेमयुक्त भावनेतून लोकं आकर्षित होतात. मिशेल देखील हेच म्हणते. ‘आमचे संबंध खूपच सामान्य आहेत. आम्ही अनेक निवांत संध्याकाळी सोबत घालवतो. आम्ही बेडवर देखील सोबतच झोपतो’, असं ती सांगते. पण आता तिच्या लग्नाची मागणी कोण कशी पूर्ण करणार?