‘५० लाख घ्या, पण योगी सरकारविरोधात खोट बोला’; पीडितेच्या कुटुंबियांना ऑफर

NCP protest at Ghatkopar
हाथरस येथे घडलेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार विरोधात आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. (फोटो - दीपक साळवी)

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी आज, मंगळवारी सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडला. दरम्यान, पोलिसांकडून १९ एफआयर या प्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक एफआयआर अज्ञातांविरोधात असून देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या एफआयआरमध्ये पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर तिच्या कुटुंबाला योगी सरकारविरोधात खोटे बोलण्यासाठी ५० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याचे आरोप करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

काय म्हटले आहे एफआयआरमध्ये

एका अज्ञात पत्रकाराने पीडितेच्या भावाला आई-वडिलांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन आपण राज्य सरकारवर समाधानी नसल्याचे सांगण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील खोटी विधानं सोशल मीडियावर व्हायरल करत सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप एफआयआरमध्ये आहे. राज्य सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला काही घटकांकडून ५० लाखांची ऑफर देण्यात आली आहे, असे यात नमूद केले आहे. एफआयआरमध्ये हे घटक म्हणजे नेमके कोण आहेत याबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. याशिवाय उत्तर प्रदेशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा –

सुशांतची बहिणच औषधातून ड्रग्ज द्यायची; संपत्तीसाठी कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त