लंडनमध्ये एचआयव्ही रुग्णावर झाला स्टेम सेल्सचा यशस्वी प्रयोग

भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) चे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीमने एचआयव्हीवर स्टेम सेल्सच्या उपचाराचा यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे.

Mumbai
HIV
एचआयव्हीवर उपचार

भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) चे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीमने एचआयव्हीवर स्टेम सेल्सच्या उपचाराचा यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमध्ये स्टेम सेल्सच्या मदतीने एका एचआयव्ही रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आला आहे. उपचार होऊन १८ महिने झाले असून तेव्हापासून आतापर्यंत या रुग्णाच्या शरीरात एचआयव्हीचे जिवाणू सापडलेले नाहीत. यासोबतच एचआयव्हीच्या औषधांचीदेखील त्यांना गरज पडलेली नाही. असे असले तरीही संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरा झाल्याचे सांगता येणार नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

या उपचाराने एचआयव्हीचे जिवाणू नष्ट

अशा पद्धतीने उपचार केल्याची ही दुसरी वेळ आहे. बर्लिनचा रहिवासी टिमोथी ब्राउनवर पहिला प्रयोग झाला होता. त्याला एचआयव्ही एड्स आणि ल्युकेमिया अशा दोन तक्रारी होत्या. रेडिओथेरेपी आणि स्टेम सेल्स वाढवून त्याच्या शरीरात इंप्लांट करण्यात आले. त्याच्या शरीरातून सुद्धा एचआयव्हीचे जिवाणू नष्ट झाले. आतापर्यंत ज्या दोन रुग्णांवर प्रयोग करण्यात आला ते दोघेही एचआयव्हीसह दुसऱ्या एका रोगाने बाधित होते. अशात फक्त एचआयव्ही असलेल्या रुग्णावर हे उपचार कसे काम करणार याची शाश्वती देता येणार नाही. सोबतच, त्या दोन्ही रुग्णांवर संशोधक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर उपचार अजुनही संपलेले नाहीत.

लंडनमध्ये केले संशोधन 

लंडनमध्ये झालेला प्रयोग युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इम्पेरियल कॉलेज लंडन, केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ अशा नामवंत इंस्टिट्युटच्या संशोधकांनी केला. तर या संपूर्ण टीमचे नेतृत्व भारतीय वंशाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता करत होते. ते युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये संशोधक आहेत. हा प्रयोग अंतिम नसला तरीही यातून संशोधकांना या दुर्धर आजारावर उपचाराची दिशा आवश्य मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एक संशोधक प्रोफेसर एड्वार्डो ओलाव्हेरिया यांनी दिली आहे.

  • गेल्या १८ महिन्यांपासून संबंधित रुग्णाला एचआयव्हीच्या औषधी घ्याव्या लागल्या नाहीत. त्याच्या शरीरात या व्हायरसचे चिन्ह सुद्धा सापडले नाहीत.
  • ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, तरीही तज्ज्ञांनी तो पूर्णपणे बरा झाला किंवा नाही यावर सांगणे घाई असेल, असे स्पष्ट केले.
  • ज्या रुग्णावर स्टेम सेल्सच्या मदतीने उपचार करण्यात आले तो एक पुरुष असून लंडनचा रहिवासी आहे.
  • त्याला २००३ मध्ये एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले होते. २०१२ मध्ये त्याला हॉजकिन्स कॅन्सर झाला.
  • कॅन्सरवर उपचार करत असताना कीमोथेरेपी करण्यात आली होती. यासोबतच, एका निरोगी व्यक्तीचे स्टेम सेल्स रुग्णाच्या शरीरात इंप्लांट करण्यात आले होते.
  • या उपचाराने त्याचा कॅन्सर आणि एचआयव्ही हे दोन्ही रोग थांबले आहेत. शरीरात या रोगाची चिन्हे सुद्धा सापडत नाहीत.