उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीत काँग्रेसचा प्रवेश?

Mumbai

कालपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाच्या आघाडीमुळे काँग्रेसची गोची होणार आणि भाजपला फायदा होणार अशी चर्चा सुरू होती, मात्र आता सपा-बसपाच्या आघाडीत काँग्रेसला समावून घेण्याचा विचार सुरू झाल्याने येथे नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

दिल्लीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो असे राजकारणात म्हटले जाते, कारण या एका राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 82 जागा आहेत. भाजपचे आव्हान रोखायचे असेल तर एकेकट्याने लढणे कठीण होईल, त्यामुळे पारंपरिक वैर विसरून सपा आणि बसपाने या ठिकाणी आघाडी केली. या ठिकाणी काँगे्रसला जास्त जागा न सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने काँग्रेसने या आघाडीकडे पाठ फिरवली होती. परंतू आता सपा-बसपच्या नेत्यांनी चार पावले मागे येऊन काँग्रेससाठी 15 जागा सोडण्याची तयारी दाखवली, ज्यात समाजवादी पक्ष 7 तर बसपा 6 जागा सोडणार आहेत. या आधी 10 जागा देण्याचा प्रस्ताव प्रियांका गांधी यांनी फेटाळला होता. या संदर्भात काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधीसमोरही आव्हाने
2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या समोर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे. 2014मध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. त्या जागांवर यंदा विजय मिळवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील ज्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तो भाग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. तसेच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ देखील पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. त्यामुळेच मोदी आणि योगी यांच्या बाल्लेकिल्ल्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असेल.निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबावर आरोप केले जातात. या आरोपांना यापुढे प्रियांका गांधी यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here