India China standoff : सीमेवर पुन्हा एकदा चकमक, भारतीय सैनिकांचा चीनमध्ये घुसून गोळीबार?; चीनचा दावा

India China standoff

भारत आणि चीन सीमेवरील तणाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. सोमवारी रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी सीमा पार करत गोळीबार केल्याचा आरोप चीनने केला आहे. चिनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गोळीबाराचा दावा केला आहे. मात्र, या गोळाबाराबाबत भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ही चकमक पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील टेकडीवर झाली.

चीनच्या वेस्टर्न थीएटर कमांडच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने या गोळीबाराचे वृत्त दिलं आहे. “भारतीय सैन्याने शेनपाओ पर्वतरांगांमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ वास्तविक नियंत्रण रेषा पार केली व गस्तीवरील चिनी सैनिक PLA त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतानाच भारतीय सैनिकांनी ताकीद देऊन गोळीबार केला. बदल्यात चिनी सैनिकांनीही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्युत्तर द्यावं लागलं.” भारताने याबाबत अधिकृत माहिती दिल्यावरच चीन खरं बोलतंय की, खोटं बोलतंय, हे स्पष्ट होणार आहे. भारत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून चीनच्या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेनेही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचं तसेच भारत-चीन यांच्यातील तणाव वाढल्याचं वृत्त दिलं आहे.

पीएलचे वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते झांग शुई यांनी भारतावर आरोप करत म्हटलं आहे की, “भारताने द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केलं आहे. यामुळे परिसरात तणाव आणि गैरसमज वाढतील. ही एक गंभीर लष्करी चिथावणीखोरी आहे.” झांग पुढे म्हणाले, “आम्ही धोकादायक पावले रोखून गोळीबार करणार्‍याला शिक्षा करावी अशी आमची भारताकडे मागणी आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी भारताने घ्यावी.”