भारताच्या अंतर्गत विषयात नाक खुपसू नका; UN मध्ये भारताने पाकिस्तान, टर्कीला फटकारलं

India slams Pakistan, Turkey and OIC at UN

भारताने काश्मीर आणि मानवाधिकारांवरुन पाकिस्तान, तुर्की आणि इस्लामिक देशांच्या संघटनेला UN मध्ये चांगलच फटकारलं आहे. जिनेवा येथे पार पडलेल्या मानवी हक्क परिषदेच्या ४६ व्या सत्रात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, टर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला भारताने मंगळवारी फटकारलं आहे. पाकिस्तान, टर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने भारतावर काश्मीरवरुन अनेक आरोप केले आहेत. त्यावर भारताने उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारातंर्गत टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये मतप्रदर्शन करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाविषयी OIC ने मांडलेला मुद्दा आम्ही फेटाळून लावतो, असं भारताने म्हटलं आहे. OIC ला भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत सुनावलं. पाकिस्तानच्या अजेंड्यासाठी OIC स्वत:चा पाकिस्तानला गैरवापर करायला देत आहे. हे स्वत:च्या हिताचे आहे का? याचा OIC ने विचार करावा, असं उत्तर जिनेवामधील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव पवन बाथे यांनी दिलं.

स्वत:च्या वाईट उद्देशांसाठी भारतावर खोटे आरोप करण्याची, बदनामी करण्याची पाकिस्तानची नेहमीची सवय आहे. पाकिस्तान तर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध यादीत नाव आलेल्या लोकांना पेंशन देतो. शिवाय, त्यांचे पंतप्रधान तर जम्मू-काश्मीरमध्ये लढण्यासाठी हजारो आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं अभिमानाने मान्य करतात, अशा शब्दात पवन बाथे यांनी मानवी हक्क परिषदेच्या सत्रात पाकला फटकारलं.