अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतिहासजमा होतील – अयातुल्ला अली खोमेनी

Ayatollah ali khamenei
अयातुल्ला अली खोमेनी

इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात आता इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी उडी घेतल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात नवाच भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणमधील लष्करी अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी ठरवलेच तर ते अमेरिकी सैन्याचा सहज पराभव करू शकतील आणि सध्या आंतरराष्ट्रीय राजकारण केंद्रस्थानी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतिहासजमा होतील, असा कडवा हल्ला खोमेनी यांनी अमेरिकेवर चढवला.
इराणच्या लष्कराने ठरवले तर ते अमेरिकी सैन्याचा नक्कीच पाडाव करतील, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असेही खोमेनी यांनी स्पष्ट केले. संभाव्य आर्थिक हादऱ्यातून वाचण्यासाठी अमेरिकेने इराणपुढे १२ सूचना ठेवल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ गेल्या सोमवारी या १२ सूचना इराणपुढे ठेवल्या होत्या.
इराणशी केलेला अण्वस्त्र करार अमेरिकेने एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे इराणच्या नेत्यांमध्ये अमेरिकेबद्दल प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीला खोमेनी यांच्या कडवट वक्तव्यामुळे तोंड फुटले आहे. अमेरिका किती बेफिकीर आहे. कोणताही विचार न करता सहजपणे ते अण्वस्त्र करार कशा पद्धतीने एकतर्फी रद्द करतात, याकडे खोमेनी यांनी लक्ष वेधले.
इराणमध्ये सत्ताबदल व्हावा, हेच अमेरिकेचे प्रमुख लक्ष्य आहे. पण त्यांचा इरादा कधीच पूर्ण होणार नाही. इराण त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही खोमेनी यांनी म्हटले आहे. इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.
इराणला आपली अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवायची असेल, तर आम्ही दिलेल्या १२ सूचना स्वीकारा, असे पॉम्पिओ यांनी म्हटले होते. या सूचनामध्ये प्रामुख्याने सीरियातून माघार घ्या, येमेनमधील हौथी बंडखोरांना दिलेला पाठिंबा काढून घ्या, प्लुटोनियमचा वापर भविष्यात कधीच करणार नाही, याची खात्री द्या, याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे इराणमधील सर्व अणुकेंद्रांची माहिती आणि तेथे प्रवेश करण्याची मुभा अमेरिकेला देण्यात यावी, अशीही सूचना अमेरिकेने इराण केली आहे.
जर या सूचना तातडीने मान्य केल्या नाहीत, तर इराणवर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले जातील, असाही इशारा पॉम्पिओ यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here