त्या ‘गेस्ट हाऊस कांड’च्या २४ वर्षांनंतर मायावती-मुलायम आले एकत्र

वाचा... मायावती आणि मुलायम सिंह यांच्यात दरी निर्माण करणारं त्या गेस्ट हाऊस कांडचे पुर्ण प्रकरण...

New Delhi
Mayawati and Mulayam Singh Yadav join trally
मुलायम सिंह यादव आणि मायावती सभेसाठी एकत्र आले

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील सपा-बसपा हे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. मात्र बसपाच्या मायावती आणि सपाचे मुलायम सिंह यादव हे आजपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहत आलेत. दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता, असे बोलले जायचे. खासकरुन १९९५ साली झालेल्या त्या गेस्ट हाऊस कांडनंतर दोन्ही नेत्यांमध्ये टोकाची कटुता निर्माण झाली. मात्र २४ वर्षांनंतर दोघेही नेते एकमेकांमधील कटुता संपवून आज एकत्र आले. उत्तर प्रदेशमध्ये २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यासाठी आज मैनपुरी येथे सभा घेण्यात आली तेव्हा दोन्ही नेते मंचावर एकत्र उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सपा आणि बसपा यांनी आघाडी केली आहे. उत्तर प्रदेशातील ३८-३८ जागांवर दोन्ही पक्ष निवडणूक लढवणार आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे बुवा-भतिजाचे समीकरण जुळवून आणले होते. ही आघाडी दिर्घकाळ चालेल, अशी प्रतिक्रिया देखील अखिलेश यादव यांनी दिली होती. तसेच जेव्हा दोन्ही पक्षांनी आघाडीची घोषणा केली होती, त्या पत्रकार परिषदेत मायावती यांनी गेस्ट हाऊस कांडचा आवर्जून उल्लेख करत देशहितासाठी आपण ती गोष्ट विसरलो असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

गेस्ट हाऊस कांडची पार्श्वभूमी

मुलायम सिंह यादव यांनी १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी १९९३ ला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी बहुजन समाज पक्षाबरोबर युती केली. त्यावेळी सपाने २५६ आणि बसपाने १६४ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी त्यांनी अनुक्रमे १०९ आणि ६७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र दोन्ही पक्षांची युती जास्त काळ टीकू शकली नाही.

घटना आहे १९९५ ची. दोन्ही पक्षांचे मतभेद टोकाला पोहोचले होते. त्यातच हे गेस्ट हाऊस कांड घडले. भाजपने या संधीचा फायदा उचलून बहुजन समाज पक्षाकडे मैत्रिचा हात पुढे केला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर बसपाचे सरकार स्थापन झाले. मायावतींनी मुलायम यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. मात्र त्या सरकारमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. मधल्या काळात त्यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे मुलायम अस्वस्थ होत होते. त्यातच मायावतींनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय सपाला कळवला.

या घटनेला त्यावेळची दिल्लीची परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कारण १९९२ साली बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर १९९३ साली भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले होते. केंद्रात तेव्हा काँग्रेसचे सरकार असून नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील सत्ता गमावणे अटल बिहारी वाजपेयी यांना खटकत होते. त्यामुळे बसपा-सपाची युती तुटावी आणि भाजपचे सरकार यावे, अशी खेळी भाजपकडून खेळली गेली आणि ते यशस्वी देखील झाले.

आणि गेस्ट हाऊस कांड घडले

सपाशी नाते तोडून स्वतःचे सरकार बनवण्यासाठी मायावतींना स्वतःचे आमदार वाचवायचे होते. यासाठी त्यांनी गेस्ट हाऊसवर सर्व आमदारांना बोलावले होते. दिनांक होती २ जून १९९५.  तिथे सपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आणि त्यांनी बसपाच्या लोकांना मारायला सुरुवात केली. त्यानंतर मायावती यांनी तिथल्याच एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. म्हणून त्या वाचल्या. सपाच्या कार्यकर्त्यांनी बसपाच्या लोकांना जबर मारहाण केली, अनेकांना गंभीर जखमी केले होते. मायावती ज्या खोलीत लपल्या होत्या, त्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आतून दरवाजा जवळ सोफा लावून ठेवल्यामुळे दरवाजा तुटू शकला नाही.

या हल्ल्यात माझी हत्या करण्याचा कट असल्याचा आरोप तेव्हा मायावतींनी केला होता. मात्र गेस्ट हाऊसवर ही बातमी कव्हर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रकार जमले होते. त्यामुळे सपाला जास्त काही करता आले नाही. याच घटनेला उत्तर प्रदेशच्या राजकारण गेस्ट हाऊस कांड बोलले जाते. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी मायावतींनी भाजपशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here