घरदेश-विदेशआता धडा शिकवाच

आता धडा शिकवाच

Subscribe

कारवाईची जागा, वेळ तुम्हीच ठरवा

भारतीय लष्कराला प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी योग्य ते स्थान आणि वेळे निवडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा नक्कीच मिळणार. आपल्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी आणि पाकिस्तानला इशारा दिला आहे.झांसी येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोणत्या वेळेस, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्वरुपात प्रत्युत्तराची कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्य दलाला देण्यात आले आहे. शेजारील देशांच्या कुटील मनसुब्यांना आपल्या देशातील 130 कोटी जनता मिळून सडेतोड उत्तर देतील.

काश्मीर पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून नवी दिल्लीत आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,तिन्ही दलाचे प्रमुख आणि अन्य मान्यवरांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. देशभर या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून शहीदांचे व्यर्थ न होवो बलिदान अशीच भावना सर्वत्र आहेत. दहशतवादी पाकिस्तानचा निषेध करणारे मोर्चे ठिकठिकाणी काढण्यात आले त्यावेळी पाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवा, बदला घ्या अशी मागणीही करण्यात आली.

- Advertisement -

आज संपूर्ण देश दुःखी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट आहे की, मोठ-मोठ्या देशांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करताना अंतर राखले आहे. पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. त्याची वाईट अवस्था करण्यात आली आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

हा भारत नवीन रीति आणि नीतिचा आहे, हे कदाचित आपला शेजारील देश विसरत आहे. दहशतवादी संघटनांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी हिंसक मानसिकता दाखवली आहे, त्याचा संपूर्ण हिशेब चुकता केला जाईल, अशी धमकी मोदी यांनी पाकिस्तानला दिली.

- Advertisement -

मोस्ट फेवर्ड नेशनच्या यादीतून पाकिस्तानला वगळले                                                                      पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानला ’मोस्ट फेवर्ड नेशन’च्या (एमएफएन) यादीतून वगळले आहे. त्यामुळे पाकिस्तानला या निर्णयाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये अत्तापर्यंत ४५ जवानांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्यामुळे केंद्र सरकारने आज तात्काळ कॅबिनेट बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी २२ वर्षानंतर पाकिस्तानला दिलेला एमएफएनचा दर्जा काढून टाकला आहे.

बदला घेणारच! सीआरपीएफच्या जवानांचा निर्धार                                                                          पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाचे वातावरण असताना हा हल्ला आम्ही विसरणार नाही, हल्ल्याचा बदला घेणारच, अशा शब्दात सीआरपीएफने हल्लेखोरांना सूचक इशारा दिला आहे. सीआरपीएफने ट्वीट करून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्घांजली वाहिली आहे. काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४५ जवान शहीद झाले. या हौतात्म्यानंतर सीआरपीएफने दिलेली प्रतिक्रिया अतिशय सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. सीआरपीएफने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत एक ट्विट केले आहे. ’आम्ही विसरणार नाही, आम्ही माफही करणार नाही’, असे या ट्विटमध्ये सीआरपीएफने म्हटलं आहे. ’पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. दहशतवाद्यांना स्पष्ट इशारा देणारे सीआरपीएफचं हे ट्विट महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

स्थानिक वाहनांना परवानगी दिल्याने घात झाला
श्रीनगर8दहशतवादी हल्ला करणार याची पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणे घातक ठरले. त्याचा फायदा फियादीन दहशतवादी अदील अहमद दार याने घेतला आणि होत्याचे नव्हते झाले. अडीच हजार जवानांचा ताफा जाण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ४० जवान शहीद झाले.मात्र हीच चूक सीआरपीएफच्या जवानांच्या जीवावर बेतली. त्यामुळे आता ही चूक सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी सीआरपीएच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाल्यामुळे यापुढे जेव्हा सुरक्षा दलांचा मोठा ताफा जाईल, त्यावेळी त्या रस्त्यावरील इतर वाहनांची वाहतूक रोखण्यात येईल. यामुळे स्थानिकांना थोडा त्रास होईल. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

…असा झाला हल्ला
सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जात होता. ताफा जाण्याआधी रोड ओपनिंग पार्टीने गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटके सापडली नव्हती. तसेच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनेही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. मात्र काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. मात्र याचा गैरफायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि त्याने कारबॉम्बचा स्फोट केला.

पाक भीक मागणार
पाकिस्तानला एमएफएनचा दर्जा मिळाल्यामुळे भारतात व्यापार करण्यासाठी कमी कर द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या वस्तू भारतात स्वस्त विकल्या जात होत्या. यामुळे त्यांच्या मालाला देशभरात चांगली मागणी होती. यामुळे त्यांना भारतीय चलन प्राप्त होत होते.

मोस्ट फेवर्ड म्हणजे काय?
मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) हा एक आर्थिक स्थराचा दर्जा आहे. ’मुक्त व्यापार करारा’च्या माध्यमातून एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्राला एमएफएन दर्जा देत असते. या दर्जामुळे तो देश एमएफएन देणार्‍या राष्ट्रामध्ये इतर देशांच्या तुलनेत अनेक सवलती घेऊन व्यापार करत असतो.

बुलढाण्यातील दोन शूरवीरांना हौतात्म्य
बुलढाणा8जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 38 जवानांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत)लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोघेही 10 फेब्रुवारीला सुटी संपल्यानंतर कर्तव्यावर रूजू झाले होते.

दहशतवादी हल्ल्याचे नाशिकमध्ये जोरदार पडसाद                                                                        जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याने त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासून उमटले.पाकच्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतलाच पाहीजे, ४० जणांच्या बदल्यात ४०० जणांची मुंडकी आम्हाला दाखवा अशा प्रतिक्रिया जिल्हयात सर्वत्र होत्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, मुस्लिम वेल्फेअर कमिटी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वराज फाऊंडेशन यांनी एकत्र येत निषेध नोंदविला. काही ठिकाणी पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन केले तर काही ठिकाणी पुतळ्याला फाशी दिली. शहरातील हुतात्मा स्मारक, शहीद स्मारक, शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा आदी ठिकाणीही शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सायंकाळनंतर अनेक संस्थांनी ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चे काढले. गोदावरीचा प्रकट दिन असल्यामुळे पुरोहित संघाच्या वतीने महाआरतीच्या वेळी प्रारंभी शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -