पाकिस्तानात बिस्किटाच्या जाहिरातीवरून वाद; मॉडेलला अश्लील म्हणत दर्शवला विरोध

पाकिस्तानात बिस्किटाच्या जाहिरातीवरून वादंग निर्माण झाले आहे. ही जाहिरात ४ ऑक्टोबरपासून टीव्हीवर दाखवली जात असून या जाहिरातीवर आता पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेट्री अथॉरिटीने (पेमरा) यांनी बंदी घातली आहे. या जाहिरातीत पाकिस्तानी अभिनेत्री मेहवीश हयात दिसून येत आहे. काही लोकं बंदीच्या बाजूने तर काही जण याला विरोध करत आहेत. मेहविश या अभिनेत्रीचे काही दिवसांपूर्वी भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमसोबत नाव जोडले गेले होते.

ही जाहिरात प्रसारीत झाल्यानंतर लगेचच २४ तासांनी प्राधिकरणाने टीव्ही वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या. अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री दाखवली जाऊ नये असे त्यात नमूद करण्यात आले. त्यानंतर एक दिवसांनी कथितरित्या या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार अन्सार अब्बासी यांनी या जाहिरातीला मुजरा संबोधून बंदीची मागणी केली. ही जाहिरात पाक समुदायासाठी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या लोकांनीही या जाहिरातीवर नाराजी दर्शवली असून सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका निदा किरमानी यांनी मात्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राध्यापक मारले जात आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याची स्थिती आहे. लैंगिक हिंसाचार आणि गुन्ह्यांचे प्रमाण टोकाला पोहोचले आहे. अशा स्थितीत लोक एका बिस्किटाच्या जाहिरातीवरून चिंतेच पडले आहेत. पाकिस्तान देखील अजब देश असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा –